इंग्लंडचा कर्णधार जो रूट सध्या सुसाट आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत रूटने हे सिद्ध केले आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने लीड्स कसोटीत शतक झळकावले आणि अशा प्रकारे सलग तिसऱ्या कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम त्याने केला आहे. रूटने नॉटिंगहॅम कसोटीत शतक झळकावले, त्यानंतर तो लॉर्ड्सवरही नाबाद शतक झळकावण्यात यशस्वी ठरला आणि आता त्याने लीड्सवर शतकी हॅट्ट्रिकही केली.

लीड्स कसोटीत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३वे शतक फक्त १२४ चेंडूत केले. हसीब हमीद बाद झाल्यानंतर रूट मैदानावर आला. लीड्सच्या खेळपट्टीवर राट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारासारखे दिग्गज फलंदाज उभे राहू शकले नाहीत, तिथे रूटने आश्चर्यकारक फटके खेळण्यास सुरुवात केली. त्याने ५७ चेंडूंत आपले अर्धशतक ठोकले आणि १२ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.

 

रूट हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने सलग तीन कसोटी शतके दोनदा केली आहेत. रूट एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा कर्णधारही बनला. त्याने २०१५ मध्ये १३६४ धावा करणाऱ्या अॅलिस्टर कुकचा विक्रम मोडला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात रूटने हा आकडा पार केला.

 

हेही वाचा – ‘‘रोहित-विराटमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही’’, पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं सुनावलं

जो रुटने या कॅलेंडर वर्षात सहा कसोटी शतके केली आहेत, त्यापैकी चार भारताविरुद्धची आहेत.  इंग्लंडचा कसोटी कर्णधार म्हणून  रूटचे हे १२ वे शतक  आहे. या विक्रमात त्याने कुकची बरोबरी केली आहे.

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके

  • ८ – जो रूट*
  • ७ – राहुल द्रविड
  • ७ – अॅलिस्टर कुक
  • ७ – सचिन तेंडुलकर
  • ६ – मोहम्मद अझरुद्दीन
  • ६ – केव्हिन पीटरसन