सलामीवीर मार्टीन गप्टील आणि मधल्या फळीत रॉस टेलरने झळकावलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली. दरमदार सुरुवातीनंतर न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडत भारतीय गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं होतं. मात्र अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांची टेलरने पुन्हा एकदा धुलाई केली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली.
अवघ्या ३४ धावांत भारताचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल माघारी परतले. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही. १५ धावांवर असताना टीम साऊदीने विराटचा त्रिफळा उडवला. दरम्यान सलग तिसऱ्या वन-डे सामन्यात विराट त्रिफळाचीत झाला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होण्याची विराटची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
Kohli’s
Last 3 OdisBowled out vs Hazlewood
Bowled out vs Sodhi
Bowled out vs Southee*For 1st time, He bowled out in 3 Consecutive Odi matches!#NZvIND
— CricBeat (@Cric_beat) February 8, 2020
दरम्यान, नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर चहलने निकोल्सला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर शार्दुल ठाकूरने टॉम ब्लंडलला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला.
मार्टीन गप्टीलने रॉस टेलरसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गप्टीलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूरच्या अचूक थ्रो-वर गप्टील धावबाद झाला. त्याने ७९ धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. अखेरीस अनुभवी रॉस टेलरने कायल जेमिन्सनच्या साथीने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. टेरलच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २७३ धावांचा टप्पाही गाठला. रॉस टेलरने नाबाद ७३ धावांची खेळी केली.
