IND vs NZ Virat Kohli Axar Patel : श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी, वरूण चक्रवर्तीचे ५ बळी व फिरकीपटूंच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या फिरकीपटू चौकडीने ९ बळी घेत किवी फलंदाजांना वेसण घातली. या विजयासह भारताने अ गटाच्या गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत गाठली आहे. यासह भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या सामन्यात भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने ३० धावांमध्ये ३ फलंदाज गमावले होते. यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ७९ धावांची तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेत भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.

त्यानंतर, भारताने दिलेले २५० धावांचं लक्ष्य घेऊन न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला. परंतु, भारताने या सामन्यात उत्कृष्ट चाल खेळत ४ फिरकीपटू मैदानात उतरवले होते. किवी संघ भारताच्या फिरकीसमोर फेल ठरला. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने १२० चेंडूत ७ चौकारांसह ८१ धावा करत एकाकी झुंज दिली. त्याच्याशिवाय कोणताही किवी फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी किवी संघाला एकेका धावेसाठी संघर्ष करायला लावला. अखेरीस भारताने न्यूझीलंडचा संघ २०५ धावांवर सर्वबाद करत मोठा विजय नोंदवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…अन् विराट अक्षर पटेलच्या पाया पडला

दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडूंची मजामस्ती देखील पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने फिरकीपटू अक्षर पटेलला नमस्कार करताना दिसला. विराटने अशी कृती करण्यामागे खास कारणही आहे. २५० धावांचं माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ सुरुवातीला सुस्थितीत होता न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विलियम्सन ८१ धावांवर नाबाद होता. मात्र, अक्षर पटेलने त्याच्या कोट्यातील शेवटच्या चेंडूवर विलियम्सनला बाद केलं. विलियम्सन अक्षरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि यष्टीरक्षक केएल राहुलकरवी यष्टीचित झाला. विलियम्सन बाद होताच भारताने अर्धा सामना खिशात घातला. या विकेटच्या आनंदात विराट कोहली थेट अक्षर पटेलसमोर नतमस्तक झाला. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.