चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी पाकिस्तानने भारताचा पराभव केला. तब्बल २५ वर्षांनंतर एखाद्या मोठ्या लढतीत भारताविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्याने संपूर्ण पाकिस्तानात मोठा आनंद साजरा होताना दिसत आहे. मात्र, पाकिस्तानी वृत्तवाहिनीचा अँकर आमिर लियाकतने अतिउत्साहाच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध गरळ ओकली आहे. पाकिस्तानने कालच्या सामन्यात क्रिकेट कशाप्रकारे खेळतात, एखाद्याला पराभवाची धूळ कशी चारली जाते, हे दाखवून दिले. आज मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की, भारताने ज्या सिंधू नदीचे पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्याच नदीच्या पाण्यात नरेंद्र मोदींनी स्वत:ला बुडवून घ्यावे. आमिर लियाकत अलीच्या या वक्तव्यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सुरूवात झाली आहे.
आमिर लियाकत हा पाकिस्तानच्या पीके टीव्हीचा अँकर आहे. पाकिस्तानच्या कालच्या विजयानंतर त्याने ‘ऐसा नही चलेगा’ या प्राईम टाईम शोमध्ये भारताविरूद्ध अक्षरश: गरळ ओकली. एखाद्याला मिळालेले यश पचवता आले नाही की, काय होते, त्याचा प्रत्यय काल आमिरच्या बोलण्यातून आला. कार्यक्रमाला सुरूवाता झाल्यापासूनच आमिरने पाकिस्तानचे गुणगान गात भारतीय संघ आणि खेळाडूंवर पातळी सोडून टीका करायला सुरूवात केली. आता भारतातील प्रत्येक आई आपल्या मुलाला रात्री झोपताना पाकिस्तानी संघाची भीती दाखवेल. बाळा पाकिस्तानी संघाला घाबरत जा, कारण जेव्हा ते येतात, तेव्हा ते खूप वाईट पद्धतीने तुम्हाला हरवतात, अशी एकाहून एक बालिश आणि हास्यास्पद विधाने आमिर लियाकतने कार्यक्रमात केली. आज आमच्याकडे तुम्हाला दाखवायला खूप व्हिडिओ आहेत. पाकिस्तानविरुद्धचा सामना हारल्यानंतर विराट कोहली कसा दिसत होता? नेहमी फुरफुरत असलेला वीरेंद्र सेहवाग काय बोलत होता?, या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला दाखवणार असल्याचे लियाकतने म्हटले.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मागील दहा वर्षातील आकडेवारीमुळे भारतीय संघ पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देईल, अशी आशा तमाम भारतीयांना होती. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर ३३९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असणारा रोहित शर्मा खातेही खोलू शकला नाही. त्यानंतर मैदानात आलेला कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. ही जोडी परतल्यानंतर भारतीय संघाची मदार ही शिखर धवन आणि युवराज सिंगवर आली. मात्र शिखर धवननेही पाकिस्तानी गोलंदाजीसमोर निराश केले. त्यानंतर हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता प्रत्येक फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजांसमोर नांगी टाकली.