Asia Cup 2025 Danish kaneria on IND vs PAK Match: आशिया चषकातील सुपर फोर टप्प्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. या सामन्यात पाकिस्तान आणि भारताच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट कामगिरी केली. पाकिस्तानचा सलामीवीर फरहान याने संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली, पण गिल-अभिषेकच्या फटकेबाजीसमोर त्याची खेळी व्यर्थ ठरली. दरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानचा सलामी फलंदाज फरहानने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली आणि शिवम दुबेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने अर्धशतक झळकावल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं. फरहानने बॅटची बंदूक करत गोळ्या घालण्याचं सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावर पाकिस्तानचा गोलंदाज दानिश कनेरियाने वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. अभिषेकने शाहीनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आक्रमक सुरूवात केली आणि यानंतर दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची कमालीची भागीदारी रचली. पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण करत त्यांनी भारताच्या विजयाचा पाया रचला.

माजी पाकिस्तान क्रिकेटपटूचं गिल-अभिषेकच्या फलंदाजीवर मोठं वक्तव्य

दानिश कनेरिया आयएएनएसशी बोलताना म्हणाला, “फरहानने AK47 बंदूक दाखवत इशारा केला, पण शुबमन गिल व अभिषेक शर्माने बॅटने कमालीची फटकेबाजी करत जणू ब्रम्होसने उत्तरं दिलं. त्यांनी तोंडाने बोलण्यापेक्षा त्यांच्या कामगिरीची चमक सर्वांना दाखवली. अभिषेक शर्माने तर फ्लाईंग किस पण दिली. आधी धुलाई केली आणि नंतर महाधुलाई केली.”

अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना उत्तर दिलं. पण तरीही सामन्यादरम्यान शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. गोलंदाजीदरम्यान पाकिस्तानचे गोलंदाज गिल-अभिषेकला स्लेज करत होते आणि या दोघांनीही जशास तसं उत्तर त्यांना दिलं आहे. ज्याचे व्हीडिओही व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानच्या संघाला त्यांच्याच संघातील खेळाडूंनी भारताविरूद्ध पराभवानंतर खूप ट्रोल केलं आहे. पाकिस्तानच्या संघाने भारताविरूद्ध फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. १० षटकांत संघाने १ विकेट गमावत ९० धावा केल्या होत्या. पण पुढील ५ षटकांत भारताने पाकिस्तानच्या फलंदाजांना झटपट बाद केलं आणि त्यांच्या धावांवर ब्रेक लावला.