Asia Cup 2025 Final PCB Filed Complaint Against Arshdeep Singh: अवघ्या काही तासांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये झालेल्या वादानंतर पीसीबी आणि बीसीसीआयने दोन्ही संघांतील खेळाडूंच्या वर्तनाबाबत आयसीसीकडे तक्रार केली होती. यावर आयसीसीने सुनावणी घेत दंडात्मक कारवाईदेखील केली. आता फायनलच्या काही तासआधी पाकिस्तानने पुन्हा एका भारतीय खेळाडूची तक्रार केली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील आणि सुपर फोर सामन्यादरम्यानच्या वर्तनाबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांनी आयसीसीकडे तक्रार केली होती. पाकिस्तान बोर्डाने सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यावर तक्रार केली होती. तर बीसीसीआयने हारिस रौफच्या ६-० आणि प्लेन क्रॅशच्या हातवाऱ्यांवर आक्षेप घेतला होता. तर फरहानने बंदूक सेलिब्रेशन केलं होतं, याबाबतही तक्रार केली होती. यावर आयसीसीने हारिस आणि सूर्यकुमार यादववर दंडात्मक कारवाई केली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने समा टीव्हीच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिलं आहे की, पाकिस्तानने भारतीय गोलंदाजाच्या अश्लील हावभावावर आक्षेप घेत त्याची तक्रार केली आहे.
पीसीबीने भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगविरुद्ध अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. २१ सप्टेंबरला (रविवार) झालेल्या भारत-पाकिस्तान सुपर फोर सामन्यादरम्यान अर्शदीपने मैदानावर हा इशारा केल्याचं पीसीबीचं म्हणणं आहे. डावखुऱ्या गोलंदाजाने आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा दावा देखील पीसीबीने केला आहे. सुपर फोरमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. अर्शदीप सिंग त्या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता.
पाकिस्तान बोर्डाने अर्शदीप सिंगविरोधात ICC कडे तक्रार का केली?
भारत-पाकिस्तान सुपर फोरमधील सामन्यादरम्यान हारिस रौफ सीमारेषेजवळ भारतीय चाहत्यांना चिडवताना दिसला. त्याने ६-० आणि प्लेन क्रॅशचे हातवारे केले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारताची ६ फायटर विमान नष्ट केल्याचा हा इशारा तो हाताने करत होता. हारिस रौफचे व्हीडिओ या सामन्यानंतर प्रचंड व्हायरल होत होते. यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्शदीप सिंगचा व्हीडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तो रागात पुढे चालत येताना दिसत होता आणि मग त्याने येऊन प्लेनचा इशारा केला. अर्शदीपचा व्हीडिओ खाली पाहू शकता. चाहत्यांनी अर्शदीपच्या या हातवाऱ्यांचा संदर्भ हारिस रौफच्या प्लेन क्रॅशला उत्तर देत असल्याशी जोडला होता.