IND vs PAK Might Clash Again in Asia Cup 2025 Final: आशिया चषक २०२५ सुपर फोरमधील चार संघांमधील लढत अधिक अटीतटीची होत आहे. भारत आणि बांगलादेश यांचे एकेक सामने झाले आहेत. तर पाकिस्तान व श्रीलंका यांचे दोन सामने झाले आहेत. यानंतर आता गुणतालिका पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो. पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेचं कसं चित्र आहे पाहूया.
पाकिस्तान संघाने सुपर फोरमधील श्रीलंकेविरूद्ध सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानच्या संघाने अंतिम फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर श्रीलंकेचा संघ आशिया चषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे.
पाकिस्तानने सुपर फोरमधील श्रीलंकेविरूद्धची सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. परिणामी श्रीलंकेचा संघ १३३ धावाच करू शकला. तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने चांगली सुरूवात करत संघाच्या विजयाचा पाया रचला. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी हसरंगा आणि तीक्ष्णाने झटपट विकेट घेत पुनरागमन केलं होतं. पण हुसैन तलत आणि मोहम्मद नवाजच्या अर्धशतकी भागीदारीने पाकिस्तानला १८व्या षटकात विजय मिळवून दिला.
पाकिस्तानच्या विजयानंतर आशिया चषकाच्या गुणतालिकेत मोठा बदल
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेत भारतीय संघ अद्याप पहिल्या स्थानी आहे. भारताने पहिला सामना जिंकत कमालीच्या ०.६८९ च्या नेट रन रेटसह पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. तर पाकिस्तानने श्रीलंकेवर १८ षटकांत विजय मिळवल्याने गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट ०.२२६ आहे. तर बांगलादेशने पहिला सामना जिंकल्याने त्यांचा नेट रन रेट ०.१२१ आहे आणि संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंकेने दोन्ही सामने गमावल्याने संघ चौथ्या स्थानी आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात २५ सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यात जर भारताने बांगलादेशचा पराभव केला तर श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. याशिवाय भारताने बांगलादेशला हरवलं तर टीम इंडिया थेट अंतिम फेरीत दाखल होईल. यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना निर्णायक ठरेल. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर संघ अंतिम फेरीत जाईल. पण बांगलादेशने मोठ्या फरकाने पाकिस्तानवर विजय मिळवला तर नेट रन रेटमुळे बांगलादेश अंतिम सामन्यात भारताविरूद्ध खेळेल.