Asia Cup 2025 Sanju Samson Controversial Catch: आशिया चषक २०२५ सुपर फोर सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात झेल सोडला, पण हार्दिकने अखेरीस तिसऱ्या षटकात भारताला विकेट मिळवून दिली. त्याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने विकेटच्या मागे कमालीचा झेल टिपला.

भारत-पाकिस्तान गट टप्प्यातील सामन्यावर नाणेफेकीदरम्यान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही, इतकंच काय तर त्याच्याकडे नजरही टाकली नाही. यामुळे भारत पाकिस्तान सामन्यातील हस्तांदोलनाचा वाद अद्याप कायम आहे.

भारताने हार्दिक पंड्याच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेल सोडला. अभिषेक शर्माने सीमारेषेजवळ फरहानचा झेल सोडला. पण हार्दिकच्या तिसऱ्या षटकात मात्र संजू सॅमसनने कमालीचा झेल टिपत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. हार्दिकने तिसऱ्या षटकात तिसरा स्लोअर चेंडू टाकला आणि फखर जमानच्या बॅटची कड घेत विकेटच्या मागे पोहोचला.

संजू सॅमसनच्या कॅचमुळे पेटला नवा वाद

चेंडू बॅटची कड घेत मागे येताच संजू चेंडूच्या दिशेने खाली वाकला आणि त्याने मैदानाला ग्लोव्हजसह हात टेकवत चेंडू सावधपणे टिपला. संजूच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू टप्पा पडला आणि संजूने हा झेल टिपला. पण पूर्णवेळ संजूच्या हाताची बोटं चेंडूच्या खाली होती. चेंडू मैदानाला लागला नाही. संजू सॅमसनने विकेटचं अपील केल्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तेव्हा फखरच्या चेहऱ्यावर निराशा होती. पण तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर तो चकित झाला होता.

फखर जमानच्या झेलमुळे मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावरील पाकिस्तानी फखर जमान बाद नसल्याचं म्हटलं. चाहत्यांनी पंचांवर भारताची बाजू घेतल्याचा आरोपही केला, पण रिप्लेमध्ये फखर जमानचा झेल बरोबर असल्याचं स्पष्ट दिसत होतं. संजूने कमालीचा झेल टिपला आणि संघाला विकेट मिळाली.