मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली आहे. भारताने दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ केवळ १९१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळच दिला नाही.

मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी धाडला. महत्वाची गोष्ट म्हणजे या ५ बळींमध्ये ४ बळी हे शमीने त्रिफळाचीत करुन घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा शमी जसप्रीत बुमराहनंतरचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. मात्र अखेरच्या फळीत पिडीट, मुथुस्वामी यांनी झुंज देत भारताचा विजय लांबवला. मात्र भारतीय गोलंदाजांनी संयमीपणे मारा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने ४ बळी घेत चांगली शमीला चांगली साथ दिली.