दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून जोहान्सबर्गमधील वाँडर्सच्या मैदानामध्ये सुरूवात होत आहे. या सामन्यामध्ये अल्लाहुद्दीन पालेकर पदार्पण करणार आहेत. अर्थात अल्लाहुद्दीन पालेकर हे क्रिकेटपटू म्हणून नाही तर पंच म्हणून पदार्पण करणार आहेत. पालेकर यांचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. पालेकर यांना ही संधी मिळण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल १५ वर्ष वाट पहावी लागलीय. दोन दिवसांपूर्वीच पालेकर यांनी आपला ४४ वा वाढदिवस साजरा केलाय. त्यांना पंच म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळण्याचा हा प्रवास फार खडतर होता, म्हणूनच त्यांच्यासाठी हा सामना फार खास असणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पंच म्हणून मैदानामध्ये उतरणारे पालेकर हे ५७ वे पंच असणार आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये पंचगिरी करणारे ते ४९७ वे पंच ठरतील. पालेकर दुसऱ्या कसोटीमध्ये त्यांचे गुरु मॅरिस इरासमस यांच्यासोबत पंच म्हणून काम पाहतील.

कसोटीमध्ये पंच म्हणून संधी मिळत असल्याने पालकर यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलंय. “हा नक्कीच माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. जेव्हा तुम्ही पंच म्हणून काम सुरु करता तेव्हा तुमचं स्वप्न आणि लक्ष्य असतं की सर्वात उंचावरील स्तरावर आपण पोहचावं. एका पंचासाठी कसोटीमध्ये पंचगिरी करण्याहून मोठं काहीच असू शकत नाही. मी १५ वर्षांपूर्वी पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मी आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहचण्यासाठी फारच वेळ लागला. यासाठी मी बरीच मेहनत गेतलीय. संयम आणि कुटुंबाने पाठराखण केल्याने मी इथपर्यंत आलोय. पंच म्हणून काम करताना तुम्हाला फार काळ घरापासून दूर रहावं लागतं,” असं पालेकर यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> IND vs SA 2nd Test: विराट विक्रमापासून कोहली सात धावा दूर; द्रविड सरांचा विक्रम मोडण्याचीही सुवर्णसंधी

“मागील अनेक वर्षांपासून मी कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमांना किंवा लग्नांना गेलेलो नाही. कारण पंच म्हणून काम आणि सराव करताना मला यासाठी कधी वेळच मिळाला नाही. माझी पत्नी शकीराने या प्रवासात मला फार साथ दिलीय. तिने फार त्याग केलाय. तिने मला या प्रवासात कायमच पाठिंबा दिला आणि संयम बाळगला. त्यामुळेच मी तिचे फार फार आभार मानू इच्छितो. ती खरोखरच माझी ताकद आहे. साथीच्या रोगामुळे खेळातील आव्हान अजून वाढली आहेत. मी आता सर्व आव्हानांचा सामना करुन पूर्णपणे या क्षणाचा आनंद घेण्यासाठी तयार आहे,” असं पालेकर म्हणालेत.

पालेकर यांनी आपल्याला इथपर्यंत पोहचण्यासाठी वडिलांनी फार प्रेरणा दिल्याचं म्हटलंय. जे माझ्या वडिलांना मिळवता आलं नाही ते मी करुन दाखवल्याचा आनंद आहे असंही पालेकर म्हणालेत. माझ्या वडिलांना कायमच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करण्याची इच्छा होती. मात्र त्यांना ते साध्य करता आलं नाही. त्यामुळेच त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पंच होण्याचा निर्णय घेतला. पालेकर यांनी अलीम डार यांच्याकडूनही पंच म्हणून प्रशिक्षण घेतलंय.

नक्की वाचा >> IND vs SA 2nd Test: विनिंग कॉम्बिनेशन ठरलेला संघ विराट-द्रविड बदलणार की…; पाहा कशी असू शकते Playing XI

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या माहितीनुसार पालेकरांचं कुटुंबामध्ये यापूर्वीही पंच होऊन गेलेत ज्यांची क्रिकेटची सेवा केलीय. पालेकर यांचे वडील म्हणजेच जमालुद्दीन सुद्धा पंच होतं. ते केपटाऊनमधील शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम करायचे. ते ९० च्या दशकामध्ये सीएसएच्या क्लब चॅम्पियनशिपसारख्या स्पर्धांमध्येही पंच म्हणून काम करायचे.