दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला आता यजमानांविरुद्ध उद्यापासून (१९ जानेवारी) वनडे मालिका (IND vs SA) खेळायची आहे. भारताला आफ्रिकेत कसोटी मालिकेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी होती, मात्र विराटसेनेची संधी हुकली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवून इतिहास रचण्याच्या आशा उंचावल्या होत्या, मात्र पुढील दोन सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवता आला नाही. आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये विजेतेपद पटकावण्यात भारतीय संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला.
मात्र, कसोटी मालिकेतील पराभव मागे टाकत भारतीय संघाची नजर आता वनडे मालिकेवर आहे. यजमानांना या फॉरमॅटमध्ये पराभूत करून कसोटीतील भारताला पराभवाचा बदला घ्यायचा आहे. आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी क्रिकेटप्रेमीही उत्सुक आहेत.
कधी, कुठे कशी पाहता येणार पहिली वनडे?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना उद्या १९ जानेवारी पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता मैदानात येतील, तर सामन्याचे थेट प्रक्षेपण अर्ध्या तासानंतर म्हणजेच दुपारी २.०० वाजता सुरू होईल. पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहिले जाईल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येईल.
हेही वाचा – ‘‘तू नेहमीच माझा कॅप्टन…”, विराटसाठी मोहम्मद सिराज झाला भावूक; पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
रबाडा मालिकेबाहेर!
आफ्रिकेचा घातक गोलंदाज कगिसो रबाडा भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेणार नाही. त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने विश्रांती दिली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) एका निवेदनात म्हटले आहे, “वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला भारताविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याने पूर्णपणे ताजेतवाने व्हावे, अशी आमची इच्छा आहे.”
दोन्ही संघ
भारत: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, रवचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज (बॅकअप- नवदीप सैनी).
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), झुबेर हमझा, मार्को जानसेन, जानेमन मलान, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, रुसी व्हॅन डर ड्युसेन आणि काइल व्हर्न (यष्टीरक्षक).