भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून पहिली कसोटी खेळणाऱ्या रोहित शर्माने लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्वतःला सिद्ध केले. पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्या दरम्यान त्याने केलेल्या एका कामगिरीमुळे तब्बल २३ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा विक्रम मोडीत निघाला.
रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे रोहित शर्माने १३ षटकारांसह एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला. याचसोबत रोहितने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याचा २३ वर्षे जुना विक्रम मोडला.
Most sixes in a Test:
13* ROHIT SHARMA
12 Wasim Akram #IndvSA
— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2019
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक १२ षटकार लगावण्याचा विक्रम वसीम अक्रमने झिम्बाब्वे विरूद्ध १९९६ साली केला होता. अक्रमने एकाच डावात नाबाद २५७ धावा ठोकल्या होत्या. त्यात त्याने १२ षटकार खेचले होते. पण त्या सामन्यात पाकिस्तानला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. तो विक्रम रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात मोडीत काढला.