IND vs SA 2nd test: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानावर भारतीय संघ फिरकीविरूद्ध अपयशी ठरला. भारताला विजयासाठी फक्त १२४ धावांचे आव्हान दिले होते, पण संघ अवघ्या ९३ धावांत सर्वबाद झाला आणि संघाने ३० धावांनी दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी संघाने जोमाने सरावाला सुरूवात केली आहे.

दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडिया कोलकाता इथे सराव करत आहे. शुबमन गिलला पहिल्या कसोटीदरम्यान मानेला दुखापत झाल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल केलं होतं, त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळू शकते. त्यामुळे मैदानावर साई सुदर्शन व ध्रुव जुरेल फलंदाजीचा सराव करत होते. पण यादरम्यान त्यांनी फक्त एका पायात पॅड घातले होते.

ईडन गार्डन्सवर झालेल्या तीन तासांच्या पर्यायी सराव सत्रात साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी फक्त पॅड बांधून फिरकी गोलंदाजांविरुद्ध बराच वेळ फलंदाजी केली. दुखापतग्रस्त शुबमन गिलच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

एक पॅड बांधून का केला फलंदाजीचा सराव?

एक पॅड बांधून फलंदाजी करण्याचे कारण म्हणजे जेव्हा पूर्ण संरक्षण वापरले जाते, तेव्हा फलंदाज अनेकदा पॅड पुढे करतात आणि बॅट मागे घेतात. पॅडला चेंडू लागल्याने पायचीत बाद होण्याचा धोका वाढतो. जेव्हा पॅड्स घातलाच नसेल तर दुखापत टाळण्यासाठी फलंदाज आपसूक बॅट पुढे घेऊन जातो. यासह फलंदाज बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रशिक्षकांच्या मते, यामुळे वेगाने वळणाऱ्या किंवा उसळणाऱ्या चेंडूंविरुद्ध फलंदाजी करताना कोणता फटका खेळायचा याचा निर्णय लगेच घ्यायला मिळतो.

डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने त्याच्या उजव्या पायाचा पॅड काढत सराव केला. डावखुरा फिरकीपटू आणि ऑफ स्पिनर्सविरुद्ध फ्रंट पॅडशिवाय फलंदाजी केल्यामुळे तो आपसूकच फ्रंट फूट पुढे न करता चेंडू खेळण्यासाठी तो बॅटचा वापर करेल. पॅडशिवाय, फलंदाजाला पहिला पर्याय म्हणून बॅटचा वापर करावा लागतो.

उजव्या हाताचा फलंदाज ध्रुव जुरेलने त्याच्या रिव्हर्स स्वीपचा सराव करताना त्याच वन-पॅड स्ट्रॅटेजीचा वापर केला. फ्रंट पॅडशिवाय, त्याला क्रीजवरून स्वीप करण्याऐवजी उजव्या पायाचा आणि शरीराच्या वजनाचा वापर करावा लागला. भारतातील टर्निंग पिचवर हा शॉट एक महत्त्वाचा रिलीज पर्याय आहे.

ईडन गार्डन्सच्या मैदानावरील या पर्यायी सराव सत्राला फक्त सहा खेळाडू उपस्थित होते, ज्यामध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा सर्वात जास्त वेळ फलंदाजी करत होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सुदर्शनवर बारकाईने लक्ष ठेवलं.