भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या २८८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सुनील अँब्रिस स्वस्तात माघारी परतल्यानंतरही शाई होप आणि शेमरॉन हेटमायर यांनी खेळपट्टीवर स्थिरावत भारतीय गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. शेमरॉन हेटमायरने भारतीय गोलंदाजांना आपलं लक्ष्य बनवत वन-डे कारकिर्दीतलं आपलं पाचवं शतक झळकावलं. या शतकी खेळीदरम्यान हेटमायरने अनेक विक्रमांचीही नोंद केली.

वन-डे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या विंडीज फलंदाजांमध्ये आता हेटमायरचं नावही घेतलं जाणार आहे. त्याने विंडीजचे माजी फलंदाज सर व्हिव रिचर्ड्स यांच्याशी बरोबरी केली आहे.

याव्यतिरीक्त सर्वात कमी डावांमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पाच शतकं झळकावणाऱ्या विंडीज फलंदाजांच्या यादीतही हेटमायर पहिल्या स्थानी पोहचला आहे. त्याने ही कामगिरी ३८ डावांमध्ये केली आहे.

विंडीजच्या शाई होपनेही एका बाजूने संयमी फलंदाजी करत हेटमायरला चांगली साथ दिली.अखेरीस मोहम्मद शमीने १३९ धावांवर हेटमायरला माघारी धाडलं. हेटमायरने १०६ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने १३९ धावा केल्या.