IND vs WI 3rd T20 Result : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२ ऑगस्ट) सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे झाला. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेस्ट इंडीजने भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मात्र, कर्णधार रोहित शर्माला दुखापतीच्या कारणास्तव सामन्यातून बाहेर जावे लागले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी डावाला आकार दिला. दोघांमध्ये ८६ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान, सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ७६ धावा फटकावल्या. ऋषभ पंतने नाबाद ३३ धावा केल्या आणि १९व्या षटकामध्येच विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून १६४ धावा केल्या. सलामीवीर कायले मेयर्सने ५० चेंडूत ७३ धावा केल्या. त्यामध्ये आठ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

त्यानंतर कर्णधार निकोलस पूरनने २२, शिमरॉन हेटमायरने २० तर रोव्हमन पॉवेलने २३ धावांचे योगदान दिले होते. भारताच्यावतीने भुवनेश्वर कुमारने दोन तर अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक बळी घेतला होता.

भारताने पहिला टी २० सामना ६८ धावांनी जिंकला होता. तर, दुसऱ्या सामन्यामध्ये ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील शेवटचे दोन सामने फ्लोरिडामध्ये होणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 3rd t20 india beat west indies by 7 wickets vkk
First published on: 03-08-2022 at 01:14 IST