भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारपासून (२२ जुलै) वेस्ट इंडीज विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघ बुधवारी (२० जुलै) त्रिनिदादला पोहोचला आहे. सामन्यापूर्वी मिळालेल्या वेळेचा फायदा करून घेण्यासाठी संघ व्यवस्थापनाने सराव सत्राचे आयोजन केले होते. जोरदार पावसामुळे भारतीय संघाला इनडोअर नेटमध्ये सराव करावा लागला. भारतीय संघाचा सराव सुरू असताना एका चाहतीने श्रेयस अय्यरची दोन तास वाट बघितल्याचे समोर आले आहे.

एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर होणार आहेत. त्यामुळे सध्या भारतीय संघ तिथे जोरदार तयारी करत आहे. पावसामुळे संघाला मैदानावरती सराव करण्याची संधी मिळाली नाही. सराव सत्राच्यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर उपाय म्हणून प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इनडोअर नेटमध्ये संघाचा सराव घेतला. भारतीय पत्रकार विमल कुमार यांनी या सराव सत्राचा एक व्हिडीओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी त्यांनी एक चाहतीशी संवाद साधला आहे.

हेही वाचा – चेतेश्वर पुजाराची ऐतिहासिक कामगिरी; लॉर्ड्सवर द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचे नाव शिझारा असून ती श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाची मोठी चाहती आहे. तिने अय्यरचा ‘ऑटोग्राफ’ घेण्यासाठी दोन तास वाट बघितली. शेवटी तिला एका लहान आकाराच्या एका बॅटवर अय्यरचा ऑटोग्राफ मिळाला. आपल्याला रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंचे ऑटोग्राफ मिळवण्याची इच्छा असल्याचे शिझारा म्हणाली.

दरम्यान, भारतीय संघाच्या सराव सत्रामध्ये कर्णधार शिखर धवन, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंग जोरदार सराव करताना दिसले. यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंगाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.