भारत विरुद्ध विंडीज एकदिवसीय मालिका सध्या सुरु असून त्यातील दुसरा सामना बुधवारी (२४) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून विराट कोहलीने १४० धावा केल्या. तर रोहित शर्माने दीडशतक (१५२*) ठोकून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.

या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचा एक मोठा पराक्रम लांबणीवर पडला. धोनीच्या सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार १२३ धावा आहेत. पण त्यापैकी १७४ धावा या आशिया इलेव्हन या संघाकडून खेळताना केल्या आहेत. त्यामुळे भारताकडून त्याला १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ ५१ धावांची गरज आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर मंगळवारी धोनीने खेळपट्टीची पाहणी केली. तसेच ग्राऊंड स्टाफशी चर्चा केली. BCCI ने याबाबत ट्विटदेखील केले असून त्यात ‘KING आला आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

गेल्या सामन्यात भारताला ३२३ धावांचे आव्हान मिळाले असूनही हे आव्हान भारताने केवळ २ गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यामुळे त्या सामन्यात भारताकडून १० हजार धावा पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. पण आता उद्याच्या एकदिवसीय सामन्यात धोनी हा पराक्रम करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराटला भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार पूर्ण करण्यासाठी केवळ ८१ धावांची गरज आहे. आहे. विराटने २१२ सामन्यात ५८.६९च्या सरासरीने ९९१९ धावा केल्या आहेत.