येत्या शुक्रवारपासून (२९ जुलै) भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर केएल राहुलला सहा दिवसांपूर्वी कोविड १९ची लागण झाली होती. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार राहुल वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही.

गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मुंबईतील बोर्डाच्या बैठकीनंतर राहुल कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. राहुलने आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या डॉक्टरांनी त्याला आणखी एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडीजला रवाना होऊ शकलेला नाही.

हेही वाचा – रोहित शर्मा अन् गँगने मिळून केली युझवेंद्र चहलची चेष्टा; इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अचानक झाली धोनीची एंट्री

जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी २० मालिकेच्या पूर्व संध्येला राहुल जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जर्मनीमध्ये शस्रक्रिया करण्यात आली. शस्रक्रिया झालेल्या राहुलने भारतात परतल्यानंतर जोरदार सराव सुरू केला होता. बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतानाचे त्याचे व्हिडीओ समोर आले होते. विशेष म्हणजे सरावासाठी त्याने भारताची घातक महिला गोलंदाज झुलन गोस्वीमाचीही मदत घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुखापतीतून बरे होत असतानाच त्याला कोविडची लागण झाली. त्यामुळे त्याचे मैदानावरील पुनरागमन पुन्हा लांबले आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेतून तो पुन्हा खेळताना दिसेल, अशी चाहत्यांना आशा आहे.