Jemimah Rodrigues Dance With Harmanpreet Kaur Father: भारतीय महिला संघाने करून दाखवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय खेळाडू वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रतिक्षेत होते. कधी फायनल, कधी सेमीफायनल तर साखळी फेरीतूनच बाहेर पडत होते. पण यावेळी संधी मिळाली ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसमोर. मायदेशात वर्ल्डकप जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. पहिला विजय हा नेहमीच लक्षात राहतो. त्यामुळे ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसून आले. दरम्यान जेमिमा रॉड्रिग्ज हरमनप्रीत कौरच्या वडिलांसोबत भांगडा करताना दिसून आली. तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जेमिमा रॉड्रिग्जचा भन्नाट डान्स
जेमिमा रॉड्रिग्ज आपल्या फलंदाजीसह मैदानावर डान्स करण्यासाठीही प्रसि्द्ध आहे. अलीकडेच तिचा मैदानावर गुलाबी साडी गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. आता अंतिम सामना जिंकल्यानंतर तिने हरमनप्रीत कौरच्या वडिलांसोबत भन्नाट डान्स केला. तिचा हरमनच्या वडिलांसोबत भांगडा डान्स करत असल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
A post shared by Loksatta (@loksattalive)
ऑस्ट्रेलियाविरूद्ध केली होती निर्णायक खेळी
या सामन्याआधी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. संपूर्ण स्पर्धेत जेमिमाची बॅट शांत राहिली होती. पण ज्यावेळी संघाला जास्त गरज होती. त्यावेळी तिने निर्णायक खेळी केली होती. भारतीय संघ या सामन्यात ३३९ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानात उतरला होता. इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करणं तेही सेमीफायनलमध्ये मुळीच सोपं नसतं. पण ती खंबीरपणे उभी राहिली आणि नाबाद १२७ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
अंतिम सामन्यात भारताचा विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या शफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची दमदार खेळी केली. तर स्मृती मानधनाने ४५ धावा केल्या. शेवटी दीप्ती शर्माने ५८ धावांची खेळी केली. भारतीय संघाने ५० षटकांअखेर २९८ धावा केल्या. २९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून लॉराने दमदार शतकी खेळी केली. पण दीप्ती शर्माच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ५२ धावांनी आपल्या नावावर केला.
