India W vs South Africa W: भारत आणि दक्षिण आफ्रिका मजा संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाला फलंदाजीत हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. पण ऋचा घोषच्या ९४ धावांच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने २५१ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण क्लार्कने नाबाद ८४ आणि ट्रायाॅनने ४९ धावांची खेळी करत भारतीय संघावर ३ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २५२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. तजमीन ब्रिट्स् शून्यावर माघारी परतली. पण दुसऱ्या बाजूने कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिने सलामीला फलंदाजी करताना १११ चेंडूंचा सामना करत ७० धावांची खेळी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केलं आणि दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले.

सुने लुस अवघ्या ५ धावांवर माघारी परतली. तर मॅरीजॅन कॅपने २०, अँनेके बॉशने १, सिनालो जाफ्ताने १४ धावांची खेळी केली. शेवटी क्लो ट्रायाॅनने ४९ धावांची खेळी केली. ट्रायाॅनने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं, पण स्नेह राणाने तिला बाद करत माघारी धाडलं.

ट्रायाॅन बाद होऊन माघारी परतली, पण डी क्लार्कने मोठे फटके खेळून दक्षिण आफ्रिकेला सामन्यात टिकवून ठेवलं. ४९ व्या षटकात २ षटकार मारून तिने दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून दिला. भारतीय संघाकडून ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऋचा घोषने ९४ धावांची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना क्लार्कने नाबाद ८४ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

ही एक चूक भारतीय संघाला महागात पडली

शेवटच्या ४ षटकात तर भारतीय संघाला विजयाची सुवर्णसंधी होती. शेवटच्या २४ चेंडूत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४१ धावांची गरज होती. त्यावेळी भारतीय संघाकडून ४७ वे षटक टाकण्यासाठी क्रांती गौड गोलंदाजीला आली होती. त्यावेळी क्लार्क स्ट्राईकवर होती. क्लार्कने लागोपाठ २ षटकार आणि १ चौकार मारला. या षटकातील पहिला चेंडू तिने वाईड चेंडू टाकला होता. या षटकात दक्षिण आफ्रिकेने १८ धावा वसूल केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्यात पुनरागमन केलं. पुढील १८ चेंडूत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या २३ धावा करायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्लार्कने ४९ व्या षटकात २ षटकार मारून सामना आपल्या नावावर केला.