स्वातंत्र्यदिनी भारतीय बिलियर्ड्स संघाने ऐतिहासिक अशा कामगिरीची नोंद केली. पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखालील भारत ‘ब’ संघाने जागतिक बिलियर्ड्स सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले तर भारत ‘अ’ संघाने रौप्यपदकाची कमाई केली.
पंकज अडवाणी, रुपेश शाह, देवेंद्र जोशी आणि अशोक शांडिल्य यांच्या भारतीय ‘ब’ संघाने अटीतटीच्या अंतिम लढतीत भारत ‘अ’ संघावर ५-४ अशी निसटती मात करत जेतेपदावर मोहोर उमटवली. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर लगेचच जागतिक सांघिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघाने घेतला होता. पुढील राष्ट्रकुल स्पर्धेत बिलियर्ड्सचा समावेश करण्यात यावा, हा त्यामागचा उद्देश होता.
आलोक कुमार, बी. भास्कर, सौरव कोठारी आणि ध्रुव सितवाला यांच्या भारतीय अ संघाने पहिल्या तीन फेऱ्यांपैकी दोन फेऱ्या जिंकून २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये भारत ब संघाने दोन फेऱ्या जिंकून सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये अडवाणी आणि शाह यांनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत भारत ‘ब’ संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी रंगलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ‘ब’ संघाने आर्यलडचा ६-० असा तर भारत ‘अ’ संघाने इंग्लंडचा ५-१ असा धुव्वा उडवला होता.
या विजयामुळे भारताचा बिलियर्ड्समधील ‘पोस्टरबॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकज अडवाणीची जागतिक जेतेपदांची संख्या १० इतकी झाली आहे. कोणत्याही क्रीडाप्रकारातील भारतीय खेळाडूने जिंकलेली ही सर्वाधिक जागतिक सुवर्णपदके आहेत.

स्वातंत्र्यदिनी सुवर्णपदक जिंकल्याने माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. १० जागतिक सुवर्णपदके जिंकणे, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे माझे पहिलेच सांघिक सुवर्णपदक असल्यामुळे अन्य सहकाऱ्यांसह खेळतानाचा आनंद वेगळाच होता. रुपेश, अशोक आणि जोशी यांनी चांगली कामगिरी केली. आमच्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात होती. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्याचा आनंद होत आहे.
-पंकज अडवाणी