भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका
राजधानीत प्रदूषित हवामानामुळे ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर झाली आहे. पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ रविवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताची ‘पर्याय शोधमोहीम’ सुरू असून, युवा खेळाडू संधीचे सोने करण्यासाठी, तर अनुभवी खेळाडू स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दिवाळीनंतरच्या प्रदूषणपर्वाचा सामना करणाऱ्या दिल्लीतील सामन्यासंदर्भात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेक जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. पाहुण्या बांगलादेश संघानेही याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. भारत दौऱ्यावर येण्याआधी अष्टपैलू शाकिब अल हसनवर घातलेल्या बंदीमुळे त्यांना धक्का बसला आहे.
प्रभारी संघनायक रोहित शर्मा सातत्याने धावांचा वर्षांव करीत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरीप्रमाणेच ट्वेन्टी-२० मालिकेतही तो प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी भारताला जवळपास २० सामने खेळायचे असून, याद्वारे समतोल संघ तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. या पाश्र्वभूमीवर अनेक पर्याय हाताळणे महत्त्वाचे ठरेल.
भारताच्या गोलंदाजीत अनुभवाचा अभाव
भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्यात अनुभवाचा अभाव आहे. प्रामुख्याने यजुर्वेद्र चहल, खलील अहमद, दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताची मदार असेल. परंतु मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे,शार्दुल ठाकूर आणि राहुल चहर हेसुद्धा गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध आहेत.
मोठय़ा खेळीसाठी शिखर उत्सुक
शिखर धवन मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरत आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने अनुक्रमे ३६ आणि ४० धावा केल्या. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील सात सामन्यांत त्याला एकमेव अर्धशतक झळकावता आले.
मधल्या फळीतील स्पर्धा तीव्र
भारताच्या फलंदाजीच्या मधल्या फळीतील स्पर्धा तीव्र आहे. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, कृणाल पंडय़ा आणि ऋषभ पंत स्थान बळकट करण्यासाठी उत्सुक आहेत. पदार्पणाचे वेध लागलेल्या शिवमकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला संधी मिळते, ते औत्सुक्याचे ठरेल. मनीष पांडे व संजू सॅमसन हेसुद्धा पर्याय उपलब्ध आहेत.
मुशफिकर, लिटनवर बांगलादेशची भिस्त: बांगलादेशचा संघ आशियातील एक बलाढय़ संघ म्हणून उदयास येत असताना शाकिब प्रकरणाचा त्यांना गंभीर धक्का बसला आहे. परंतु कर्णधार महमदुल्ला रियादच्या नेतृत्वाखाली ते उत्तम प्रतिकार करतील अशी अपेक्षा आहे. लिटन दास, मुशफिकर रहिम आणि सौम्य सरकार यांच्यावर बांगलादेशच्या कामगिरीची भिस्त असेल.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.
बांगलादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.
* सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १
