प्रकाशझोतातील कसोटीविषयी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा इशारा
भारत-बांगलादेश कसोटी मालिका : – दवाचा घटक परिणामकारक न ठरल्यास भारताचा प्रकाशझोतातील कसोटी सामन्याचा पहिलावहिला प्रयोग निश्चितच यशस्वी ठरेल, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुवारी व्यक्त केली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सादर केलेला प्रकाशझोतातील कसोटी सामन्याचा प्रस्ताव बांगलादेशने स्वीकारला. त्यामुळे कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर २२ नोव्हेंबरपासून रंगणारा कसोटी मालिकेतील दुसरा सामना प्रथमच प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. सचिननेसुद्धा ‘बीसीसीआय’च्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
‘‘कसोटी हा क्रिकेटचा गाभा असल्याने प्रकाशझोतातील सामन्यांमुळे त्याला नक्कीच नवचैतन्य प्राप्त होईल. परंतु दवाचा घटक यामध्ये परिणामकारण ठरल्यास सामन्यातील चुरस कमी होऊ शकते,’’ असे सचिन म्हणाला.
‘‘दवामुळे एकदा चेंडू ओलसर झाला, तर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही खेळपट्टीकडून साहाय्य लाभणार नाही. त्यामुळे फक्त फलंदाजांचेच वर्चस्व पाहावयास मिळेल. मात्र दव नसले तर निश्चितच एक कडवी झुंज चाहत्यांना अनुभवता येईल,’’ असेही ४६ वर्षीय सचिनने सांगितले.
प्रकाशझोतातील एकदिवसीय सामन्यांत ईडन गार्डन्सवर मोठय़ा प्रमाणावर दव पडते. त्यामुळे कसोटीला त्याचा फटका बसू नये, अशी माझी इच्छा असल्याचे सचिनने नमूद केले.
भारताने गुलाबी चेंडूने सरावा करावा!
बांगलादेशविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी आतापासूनच गुलाबी चेंडूने सराव करण्यास सुरुवात करावी, असे सचिनने सुचवले.
‘‘गुलाबी चेंडू सायंकाळच्या वेळेस मोठय़ा प्रमाणावर स्विंग होतो. त्याशिवाय भारतीय खेळपट्टय़ांवर तो कशा प्रकारे वळेल, हेसुद्धा कोणी ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे फक्त कसोटीच्या दोन-तीन दिवस आधी तयारी करण्याऐवजी भारतीय खेळाडूंनी ट्वेन्टी-२० मालिका संपल्यानंतर किंबहुना त्यादरम्यानच सराव सत्रात गुलाबी चेंडूने खेळण्यास सुरुवात करावी. त्याशिवाय दुलीप करंडकात खेळलेल्या खेळाडूंशी चर्चा करणेही भारतासाठी लाभदायक ठरेल,’’ असे सचिनने सांगितले.
