नवी मुंबई : स्मृती मानधना आणि रिचा घोष यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे.
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १ बाद १८७ अशी मजल मारली होती. याचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती. मात्र, देविका वैद्यने चौकार मारल्याने भारतीय महिला संघाची ५ बाद १८७ अशी धावसंख्या झाली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
या निर्णायक एका षटकात स्मृतीने एक चौकार व एक षटकार आणि रिचाने एक षटकार मारल्याने भारताला २० धावा करता आल्या. त्यानंतर भारताच्या रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियाला १६ धावांवर रोखले. यात तिसऱ्या चेंडूवर रेणुकाने गार्डनरला राधाकरवी झेलबाद केले. त्यामुळे भारताने विजय मिळवला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने बेथ मूनी आणि ताहलिया मॅकग्रा जोडीच्या १५८ धावांच्या भागीदारीमुळे भक्कम आव्हान उभे केले. मूनीनने ५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८२, तर मॅकग्राने ५१ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली.
आव्हानाचा पाठलाग करताना स्मृतीने ४९ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह केलेल्या ७९ धावा आणि रिचा घोषने १३ चेंडूंत ३ षटकारांसह फटकावलेल्या २६ धावा निर्णायक ठरल्या. देविका वैद्यनेही अखेरच्या षटकात दोन चौकार लगावत सामना बरोबरीत आणला. स्मृतीने प्रथम शफाली वर्माच्या (३४) साथीने ७६ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत (२१) तिसऱ्या गडय़ासाठी ६१ धावा जोडल्या. मात्र, धावांच्या वाढत्या समीकरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात स्मृती, हरमनप्रीत लागोपाठ बाद झाल्या. मात्र, रिचाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत निर्णायक क्षणी तीन षटकार ठोकत आव्हान आवाक्यात आणले. अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना रिचा आणि देविकाने १३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत १ बाद १८७ (बेथ मूनी नाबाद ८२, ताहलिया मॅकग्रा नाबाद ७०; दीप्ती शर्मा १/३१) विजयी वि. भारत : २० षटकांत ५ बाद १८७ (स्मृती मानधना ७९, शफाली वर्मा ३४; हेदर ग्रॅहम ३/२२)
* सुपर ओव्हर : भारत २०, ऑस्ट्रेलिया १६