महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या ट्रॉफीवर भारतीय संघाने आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव करत ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. शफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांची अष्टपैलू कामगिरी सामन्यात महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान विजयानंतर महिला संघाचे कोच अमोल मुझुमदार यांनी रोहित शर्माचं टी-२० विश्वचषक विजयानंतरचं आयकॉनिक सेलिब्रेशन पुन्हा केलं.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषक २०२४ चं जेतेपद पटकावलं. बार्बाेडोसच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने त्या मैदानावर भारताचा तिरंगा रोवला होता. आता महिला संघाच्या विजयानंतर कोच अमोल मुझुमदार यांनी डी वाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर तिरंगा रोवत सेलिब्रेशन केलं.

अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने त्यांचा पहिला विश्वचषक जिंकला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या अमोल मुझुमदार यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी कधी मिळाली नाही. पण त्यांनी भारतीय महिला संघाच्या ताफ्यात एक ट्रॉफी आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली. भारतीय महिला क्रिकेटमध्ये या विश्वचषक जेतेपदानंतर भविष्यात महत्त्वपूर्ण बदल होताना दिसतील.

भारताच्या विजयानंतर भावुक झालेले कोच अमोल मुझुमदार म्हणाले, “माझ्याकडे शब्द नाहीयेत. मुलींचा प्रचंड अभिमान वाटतोय. त्या या विजयाच्या आणि प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार आहेत.”

कोच पुढे म्हणाले, “आम्ही कधीच सुरुवातीच्या अडचणींमुळे स्वतःची ओळख ठरू दिली नाही. बहुतांश सामन्यांमध्ये आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली. फक्त शेवटचा टप्पा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करणं बाकी होतं आणि एकदा ते साध्य झालं, की मग मागे वळून पाहावं लागलंच नाही.”

“फिटनेस आणि फील्डिंग, ह्या गोष्टींबद्दल आम्ही ड्रेसिंगरूममध्ये सतत बोलत आलो आहोत. आज मैदानावर दिसलेली ती ऊर्जा, तो जोश, दाखवतोय की या खेळाडूंनी किती प्रगती केली आहे. मला खरंच यापेक्षा अधिक काही हवं होतं असं म्हणता येणार नाही,” असं शेवटी कोच अमोल मुझुमदार म्हणाले.