Team India Creates World Record: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात फलंदाजांनी आपल्या खेळीची छाप पाडत संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातही भारताने पहिल्या डावात २२४ आणि दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आहेत. यादरम्यान फलंदाजांनी अनेक चौकार-षटकार लगावले आहेत आणि एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

भारतीय संघाने प्रत्येक सामन्यातील प्रत्येक डावात २००हून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या फलंदाजी फळीतील टॉप-५ फलंदाजांसह अष्टपैलू खेळाडूंनीही उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या धावांमध्ये वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. भारताकडून शुबमन गिलने या मालिकेत सर्वाधिक ७५४ धावा केल्या आहेत.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी या मालिकेत चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत एक विश्वविक्रम रचला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय फलंदाजांनी ४२२ चौकार आणि ४८ षटकार मारले. एकूण, त्यांनी ४७० बाऊंड्रीज मारल्या आहेत जो एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने एका कसोटी मालिकेत ४६० बाऊंड्रीज मारण्यात यश मिळवले होते.

भारतीय संघाने कसोटीत पहिल्यांदाच केला असा पराक्रम

१९९३ च्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने ४५१ चौकार आणि ९ षटकारांसह एकूण ४६० बाऊंड्रीज लगावल्या होत्या. पण आता टीम इंडियाने ४७० बाऊंड्रीज लगावत त्यांचा विक्रम मोडला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकाच कसोटी मालिकेत एकत्रितपणे ४०० पेक्षा जास्त चौकार-षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी १९६४ मध्ये भारतीय फलंदाजांनी एकाच कसोटी मालिकेत एकत्रितपणे ३८४ चौकार-षटकार लगावले होते.

भारताच्या १२ फलंदाजांनी झळकावली शतकं

इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या १२ फलंदाजांनी शतकं झळकावली, हा देखील एक अनोखा विक्रम आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम केला आहे. या तिन्ही संघांच्या १२ फलंदाजांनी कसोटी मालिकेत शतकं झळकावली आहेत. याआधी १९७८-७९ च्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या ११ फलंदाजांनी शतकं झळकावली होती.

ओव्हल कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावत ११८ धावा केल्या. त्याच्याशिवाय नाईट वॉचमन आकाश दीपने ६६ धावांची अनपेक्षित खेळी केली. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ५३-५३ धावांचे योगदान दिले.