India Won Asia Cup 2025 Final against Pakistan: रविवारचा दिवस भारतीय संघासाठी आणि तमाम भारतीयांसाठी सुपर संडे ठरला. भारतीय संघानं आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला नमवत इतिहास घडवला. तब्बल ४१ वर्षांनंतर हे दोन संघ आशिया कपच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. या सामन्यात भारतानं विजय मिळवत पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहण्याची आपली मालिका कायम ठेवली. भारत व पाकिस्तानमधील ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या सामन्याची मोठी चर्चा होती. सामन्यानंतर घडलेल्या नाट्यात त्याचेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. यावर बीसीसीआयकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

काय घडलं सामन्यानंतर?

पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना होणार असल्याचं स्पष्ट होताच बीसीसीआयनं आपली भूमिका स्पष्ट केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला प्रोटोकॉलनुसार त्यांच्याहस्ते ट्रॉफी दिली जाणार होती. मात्र, पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यासाठी भारतानं आधीच आपण नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. आयोजकांकडून मात्र त्यासंदर्भात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभावेळी मोठा संभ्रम निर्माण झाला.

आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न खेळलेल्या रिंकू सिंहचा हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यात समावेश झाला आणि विजयी फटका मारण्याची संधी त्याच्या वाट्याला आली. ३ चेंडूंत १ धाव विजयासाठी आवश्यक असताना रिंकू सिंहनं चौकार लगावत भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. मात्र, त्यानंतर बराच वेळ पारितोषिक वितरण समारंभाची कोणतीही हालचाल दिसली नाही. हा समारंभ जवळपास तासभर लांबला. मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी न स्वीकारण्यावर भारतीय संघ ठाम होता.

अखेर पाकिस्तानच्या खेळाडूंना उपविजेतेपदाचे मेडल्स दिल्यानंतर हा समारंभ आटोपता घेतला गेला आणि टीम इंडियानं ट्रॉफीशिवायच सामन्यानंतरचं विजयाचं सेलिब्रेशन केलं.

मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन गेले!

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पारितोषिक वितरण समारंभासंदर्भात मोठा दावा केला आहे. भारतानं नक्वींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार नसल्याचं सांगितल्यानंतर नक्वी चक्क आशिया कप आणि खेळाडूंचे मेडल्स घेऊन गेले, असं सैकिया म्हणाले आहेत.

“आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही ACC चे अध्यक्ष मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की हे महाशय ट्रॉफी आणि मेडल्स सोबत घेऊन जातील. हे फार दुर्दैवी आणि खेळ भावनेच्या विरुद्ध आहे. आम्हाला आशा आहे की आशिया चषक आणि खेळाडूंचे मेडल्स लवकरात लवकर भारताला परत केले जातील. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ICC कॉन्फरन्समध्ये आम्ही या प्रकाराचा निषेध नोंदवणार आहोत”, असं देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत भारताची भूमिका काय?

दरम्यान, सैकिया यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासंदर्भात भारताची भूमिकाही यावेळी स्पष्ट केली. “BCCI नं कायम भारत सरकारने ठरवून दिलेले नियम व सूचनांचं पालन केलं आहे. त्यामुळे जिथे फक्त दोन देशांमधील सामने असतील, तिथे भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही. बीसीसीआय हे धोरण गेल्या १२ ते १५ वर्षांपासून पाळत आहे. सरकारनं आम्हाला सांगितलंय की ज्या स्पर्धांमध्ये अनेक संघ खेळत असतात, अशा स्पर्धांमध्ये आपल्याला खेळावं लागेल. कारण तिथे खेळलो नाही तर आंतरराष्ट्रीय संघटना भारतीय संघटनेवर बंदीची कारवाई करू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या धोरणाचं आम्ही पालन करतो”, असं सैकिया म्हणाले.