दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिप (SAFF)च्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३-१ ने विजय मिळवत भारताने या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

बांगलादेशमधी बंगबंधू राष्ट्रीय मैदानात झालेल्या सामन्यात भारताकडून महावीर सिंग दोन तर सुमीत पासीने एक गोल केला. पहिल्या सत्रामध्ये पाकिस्तान संघाने भारताला कडवे आव्हान दिले. पहिल्या सत्रात दोन्ही संगाना गोल करण्यात अपयश आले. मात्र दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. सामन्याच्या ४८ व्या मिनीटाला भारताकडून महावीर सिंगने गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर पुन्हा एकदा महावीरने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. सुमीत पासीने तिसरा गोल करत भारतीय संघाची आघाडी ३-० केली. सामन्याच्या अखेरच्या काही मिनीटांमध्ये पाकिस्तानच्या हसन बशिरने गोल केला. मात्र तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. अखेर भारताने सामना ३-१ च्या फरकाने जिंकला.

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिपमध्ये भारत आतापर्यंत अपराजित आहे. भारताने साखळी स्पर्धेत श्रीलंका आणि मालद्वीव यांचा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली होती. सप्टेंबर २०१३ मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, त्यावेळे भारताने पाकिस्तानचा १-०च्या फरकाने पराभव केला होता. भारताने आतापर्यंत सात वेळा दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिपवर नाव कोरले आहे.