कसोटीची रंगत-संगत पाचव्या आणि अखेरच्या दिवशी अगदी अखेरच्या षटकापर्यंत टिकून होती. भारतीय संघ सावधपणे खेळणार हे सकाळच्या सत्रातच स्पष्ट झाले. त्यानंतर ३ बाद २०१ अशा सुस्थितीत असलेल्या भारताचा दुसरा डाव ७ बाद २१७ असा कोसळला. त्या वेळी ऑस्ट्रेलियन भूमीवरील आणखी एका पराभवाचे संकट समोर उभे ठाकले होते; परंतु अजिंक्य रहाणे (३८ नाबाद) आणि भुवनेश्वर कुमार (२० नाबाद) या जोडीने संघर्षमय परिस्थितीतील १२ षटके खेळून काढली आणि सिडनी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले; परंतु चार कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकून ऑस्ट्रेलियाने बोर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरले.
अखेरच्या दिवशी भारतापुढे ९० षटकांत ३४९ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; परंतु चहापानानंतरच्या सत्रात भारताचा डाव गडगडला आणि पराभवाची लक्षणे दिसू लागली. परंतु ८९.५ षटकांत ७ बाद २५२ धावापर्यंत मजल मारून भारताने कसोटी अनिर्णीत राखली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. याचप्रमाणे या मालिकेत १२८.१६च्या सरासरीने चार शतके आणि दोन अर्धशतकांसह ७६९ धावा काढून त्याने मालिकावीर पुरस्कारही पटकावला.
भारताने चहापानापर्यंत २ बाद १६० अशी दमदार मजल मारली होती. त्यामुळे शेवटच्या सत्रात भारताला विजयासाठी ३३ षटकांत १८९ धावांची आवश्यकता होती; परंतु अखेरच्या सत्रातील नाटय़ाने कसोटीची रंगत वाढवली. मुरली विजय (८०), सातत्याने धावा काढणारा कर्णधार विराट कोहली (४६), सुरेश रैना (०) आणि रविचंद्रन अश्विन (१) झटपट बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाने विजयाच्या दिशेने आक्रमक रणनीती अवलंबली; परंतु रहाणे-भुवनेश्वरने टिच्चून फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हॅझलवूड, मिचेल स्टार्क आणि ऑफ-स्पिनर नॅथन लिऑन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
अ‍ॅडलेड आणि ब्रिस्बेन कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर मेलबर्नची ‘बॉक्सिंग डे’ कसोटी अनिर्णीत राहिली होती. सिडनी कसोटीसुद्धा निर्णायक ठरावी, या उद्देशाने स्मिथने शुक्रवारच्याच ६ बाद २५१ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला; परंतु सकाळच्या सत्रात मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी धिम्या गतीने खेळाला प्रारंभ करून भारताचे इरादे स्पष्ट केले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) :  ७ बाद ५७२ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) : ४७५
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ६ बाद २५१ (डाव घोषित)
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. हॅडिन गो. हॅझलवूड ८०, लोकेश राहुल झे. वॉर्नर गो. लिऑन १६, रोहित शर्मा झे. स्मिथ गो. वॉटसन ३९, विराट कोहली झे. वॉटसन गो. स्टार्क ४६, अजिंक्य रहाणे नाबाद ३८, सुरेश रैना पायचीत गो. स्टार्क ०, वृद्धिमान साहा पायचीत गो. लिऑन ०, रविचंद्रन अश्विन पायचीत गो. हॅझलवूड १, भुवनेश्वर कुमार नाबाद २०, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ८) १२, एकूण ८९.५ षटकांत ७ बाद २५२

बाद क्रम : १-४८, २-१०४, ३-१७८, ४-२०१, ५-२०३, ६-२०८, ७-२१७
गोलंदाजी : मिचेल स्टार्क १९-७-३६-२, रयान हॅरिस १३-३-३४-०, नॅथन लिऑन ३०.५-५-११०-२, स्टीव्हन स्मिथ २-०-७-०, शेन वॉटसन ८-२-२२-१.