वृत्तसंस्था, लंडन : वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराच्या भेदक माऱ्यामुळे भारताने मंगळवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर १० गडी राखून विजयी सलामी नोंदवली. बुमराने ७.२ षटकांत १९ धावांत ६ बळी घेत इंग्लंडचा डाव फक्त ११० धावांत गुंडाळला. मोहम्मद शमीने (३/३१) त्याला उत्तम साथ दिली. मग कर्णधार रोहित शर्मा (५८ चेंडूंत नाबाद ७६ धावा) आणि शिखर धवन (५४ चेंडूंत नाबाद ३१ धावा) यांनी १८.४ षटकांत ११४ धावा करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.
इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या धवनला लय गवसण्यास थोडा वेळ लागला. १७ चेंडूंत त्याने फक्त २ धावा केल्या होत्या. परंतु रीसी टॉपलेच्या गोलंदाजीवर दोन सलग चौकार खेचल्याने त्याचा आत्मविश्वास परतला. दुसरीकडे, रोहितने आक्रमक फटकेबाजी करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रोहितने सात चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी केली. यापैकी क्रेग ओव्हर्टनच्या गोलंदाजीवर मारलेले पुलचे फटके डोळय़ांचे पारणे फेडणारे होते. यातील एक षटकार आणि एक चौकार ठरला. ब्रायडन कर्सीला हुकद्वारे षटकार खेचत रोहितने अर्धशतक साकारले. मग कर्सीला आणखी एक षटकार मारला. धवनच्या चौकाराने भारताने शानदार विजयाची नोंद केली.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बुमराने कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी करीत तो सार्थ ठरवला. बुमराने डावाच्या दुसऱ्याच षटकात जेसन रॉय आणि जो रूट यांना अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर शून्यावर बाद केले. मग शमीने बेन स्टोक्सलाही भोपळा फोडू दिला नाही. त्यामुळे ३ बाद ७ अशी इंग्लंडची त्रेधातिरपीट उडाली. मग बुमराने जॉनी बेअरस्टो (७) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (०) यांना अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या षटकात बाद करीत इंग्लंडची ५ बाद २६ अशी केविलवाणी अवस्था केली. परंतु कर्णधार जोस बटलर (३०), मोईन अली (१४), डेव्हिड विली (२१) आणि ब्रायडन कर्सी (१४) यांनी दोन आकडय़ांत धावा केल्याने इंग्लंडला जेमतेम धावसंख्येच्या शतकाचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडकडून विली आणि कर्सी यांनी नवव्या गडय़ासाठी ३५ धावांची भागीदारी केली. बुमराने कर्सीचा त्रिफळा उडवत २५.१ षटकांत इंग्लंडचा डाव ११० धावांवर संपुष्टात आणला. त्याने सहापैकी चार फलंदाजांचा त्रिफळा उडवला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २५.१ षटकांत सर्व बाद ११० (जोस बटलर ३०, डेव्हिड विली २१; जसप्रित बुमरा ६/१९, मोहम्मद शमी ३/३१) पराभूत वि. भारत : १८.४ षटकांत बिनबाद ११४ (रोहित शर्मा नाबाद ७६, शिखर धवन नाबाद ३१; डेव्हिड विली ०/८)
सुरुवातीपासूनच चेंडू स्विंग झाल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला. जेव्हा चेंडूला खेळपट्टीकडून मदत मिळते, तेव्हा अधिक काही करण्याची गरज नसते. मी आणि शमीने योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळाला. यष्टीरक्षक आणि स्लिपमधील खेळाडूंची जबाबदारी आणखी वाढली. पंतने आपली भूमिका चोखपणे बजावली.
-जसप्रित बुमरा
११० इंग्लंडची ११० ही भारताविरुद्धची नीचांकी धावसंख्या ठरली. याआधी २००६मध्ये जयपूर येथे इंग्लंडचा डाव ३७ षटकांत १२५ धावांत गारद झाला होता.
१५० मोहम्मद शमीने ८०व्या एकदिवसीय सामन्यात १५० बळींचा टप्पा गाठला.
११ एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा बळी घेणारा बुमरा हा भारताचा ११वा गोलंदाज ठरला आहे.
३ बुमराची १९ धावांत ६ बळी ही स्टुअर्ट बिन्नी (६/४) आणि अनिल कुंबळे (६/१२) यांच्यानंतर भारताकडून तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
जसप्रित बुमरा ७.२-३-१९-६
- सामनावीर : जसप्रित बुमरा.