नवी मुंबई : पहिल्या विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार करण्यापासून भारतीय महिला क्रिकेट संघ केवळ दोन विजय दूर आहे. मात्र, या स्वप्नपूर्तीच्या मार्गातील सर्वांत मोठ्या अडथळ्याला त्यांना आज, गुरुवारी सामोरे जावे लागणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत आज भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचेही सावट आहे.

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ निर्विवाद वर्चस्व राखून आहे. विश्वचषक स्पर्धांत ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या १५ सामन्यांपासून अपराजित आहे. त्यांनी अखेरचा पराभव आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ च्या स्पर्धेत स्वीकारला होता. त्या वेळी उपांत्य लढतीत भारतानेच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. या सामन्यात हरमनप्रीत कौरने ११५ चेंडूंत नाबाद १७१ धावांची झंझावाती खेळी करताना क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. आता याच कामगिरीतून प्रेरणा घेत विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या वेळी त्यांना घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबाही लाभणे अपेक्षित आहे.

विक्रमी सात वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाने यंदाच्या स्पर्धेतही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांनी सातपैकी सहा साखळी सामने जिंकताना गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले. यात भारतावरील विजयाचाही समावेश आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला.

भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. साखळी फेरीत भारताने सातपैकी तीन सामने जिंकले, तीन गमावले आणि त्यांचा एक सामना रद्द झाला. भारतासाठी चिंताजनक बाब म्हणजे, त्यांना तीन पराभव ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्करावे लागले. आता विश्वचषक जिंकायचा झाल्यास बाद फेरीत याच तीनपैकी दोन संघांना भारतीय संघाला पराभूत करावे लागेल.

साखळी फेरीत भारतीय संघाने अखेरच्या षटकांत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत काही चुका केल्या. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरला. मात्र, आता बाद फेरीत एक चूकही भारताचे आव्हान संपुष्टात आणू शकेल. त्यामुळे भरीव सांघिक कामगिरी करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

मनधानावर भिस्त, शफालीला संधी?

– साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान भारताची सलामीची फलंदाज प्रतिका रावलच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार आहे. बदली खेळाडू म्हणून शफाली वर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

– उपांत्य लढतीपूर्वी दोन दिवस शफालीने नेट्समध्ये घाम गाळला. तिने प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्याशीही बरीच चर्चा केली. त्यामुळे उपांत्य फेरीत शफालीला अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. शफालीमध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्याची क्षमता असून याचा भारताला फायदा होऊ शकेल.

– भारताच्या फलंदाजीची भिस्त उपकर्णधार स्मृती मनधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर असेल. सांगलीकर मनधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या चार एकदिवसीय सामन्यांत अनुक्रमे ५८, ११७, १२५ आणि ८० धावा अशी कामगिरी केली आहे.

– दीप्ती शर्माचे अष्टपैलू योगदानही निर्णायक ठरू शकेल. अतिरिक्त फिरकी गोलंदाज म्हणून राधा यादव आणि स्नेह राणा यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हिलीला रोखण्याचे आव्हान

यंदाच्या स्पर्धेत भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात ३३१ धावांचे खडतर लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून गाठले होते. या विजयात कर्णधार एलिसा हिलीने (१४२ धावा) महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता तिला रोखण्याचे भारतीय संघासमोर आव्हान असेल. सलामीची फलंदाज फिबी लिचफिल्ड आणि अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा यांच्या कामगिरीत सातत्य नाही. मात्र, ॲश्ली गार्डनर (२६५ धावा आणि ७ बळी), ॲनाबेल सदरलँड (११४ धावा आणि १५ बळी), तसेच अलाना किंग (५५ धावा आणि १३ बळी) यांनी चमक दाखवताना ऑस्ट्रेलियाच्या यशात योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाची ११व्या क्रमांकावरील फलंदाजही धावा करण्यात सक्षम असून हीच त्यांची सर्वांत मोठी ताकद मानली जाते.

पाऊस झाला तर…

नवी मुंबई येथे गुरुवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘आयसीसी’च्या नियमानुसार, उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे गुरुवारी होऊ शकला नाही, तरी तो शुक्रवारी खेळविण्याचीही मुभा आहे. नियोजित दिवशी सामन्याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यात षटके कमी करून सामना संपविण्याचा प्रयत्न होईल. मात्र, ते शक्य न झाल्यास राखीव दिवशी सामना खेळवला जाईल. राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास साखळी फेरीअंती गुणतालिकेत वरच्या स्थानावर असणारा संघ थेट अंतिम फेरी गाठेल. ऑस्ट्रेलियन संघ अव्वल, तर भारतीय संघ चौथ्या स्थानी राहिला होता. त्यामुळे दोनही दिवस खेळ होऊ न शकल्यास ऑस्ट्रेलिया आगेकूच करेल.