२०१८ मध्ये हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारताने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघासमोर प्रस्ताव सादर केला. भारतासह पाच देशांनी पुरुष आणि महिलांच्या एकाचवेळी होणाऱ्या विश्वचषकासाठी प्रस्ताव सादर केल्याचे हॉकी महासंघाने स्पष्ट केले. महासंघाच्या जाहीर केलेल्या पत्रकानुसार पुरुषांचा विश्वचषक आयोजनासाठी चार तर महिला विश्वचषक आयोजनासाठी तीन देशांनी प्रस्ताव सादर केला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, मलेशिया आणि न्यूझीलंड या देशांचा यामध्ये समावेश आहे. निवेदनकर्त्यां देशांनी आपले प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती.
आंतरराष्ट्रीय महासंघ प्रत्येक प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करणार असून, यानंतर त्यावर चर्चा होईल. याच्याबरोबरीने प्रस्ताव सादर करणाऱ्या देशांतील शहरांना भेट देऊन माहितीचा आढावा घेण्यात येईल. आयोजनासंदर्भातला अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची विशेष कार्यकारिणी घेणार आहे. ७ नोव्हेंबरला आयोजन कुठल्या देशाला मिळणारा यासंबंधी घोषणा करण्यात येणार आहे.
‘आयोजनासाठी विविध देशांच्या प्रस्तावांनी आंतरराष्ट्रीय महासंघाचा उत्साह वाढला आहे. प्रत्येक प्रस्तावाचा दर्जा आणि स्पर्धात्मक स्वरुप प्रभावशाली आहे’, असे महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केली फेअरवेदर यांनी सांगितले.