संक्रमण स्थितीमध्ये प्रत्येकाला आधाराची, पाठिंब्याची, मदतीची गरज असते. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या आक्रमक वृत्तीच्या जोरावर इतिहास घडवण्याचा प्रयत्नांमध्ये आहे. तब्बल २२ वर्षे भारताला श्रीलंकेच्या धर्तीवर मालिका विजय मिळवता आलेला नाही, पण भारतीय संघ तिसरा कसोटी सामना जिंकण्याच्या उंबरठय़ावर असून त्यासाठी त्यांना अखेरच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी श्रीलंकेच्या सात फलंदाजांना बाद करावे लागेल. तळाच्या फलंदाजांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात २७४ धावा करीत श्रीलंकेपुढे ३८६ धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेची ३ बाद ६७ अशी अवस्था झाली असून त्यांचा विजय जवळपास अशक्यप्राय समजला जात आहे.
रविवारी धक्कादायक फलंदाजीनंतर सोमवारी रोहित शर्माने दमदार फलंदाजीचा नजराणा पेश केला. ३ बाद २१ धावसंख्येवरून पुढे खेळताना नवीन चेंडूवर खेळताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सावध पवित्रा घेतला होता. काही वेळेला पायचीतची अपिलेही झाली, पण संयमपणे खेळत या दोघांनी १९ व्या षटकात संघाला पन्नाशी ओलांडून दिली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी ९० चेंडूंत ५० धावांची भागीदारीही रचली. पहिल्या सत्राच्या पेयपानाच्या पूर्वी प्रदीपने ‘आऊट स्विंग’ चेंडूवर कोहलीला बाद केले. कोहली बाद झाल्यावर रोहितने स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ६० चेंडूंमध्ये अर्धशतकी भागीदारी पूर्ण करीत संघाला दोनशे धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रोहितने ७१ चेंडूंमध्ये वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले, पण उपाहाराला १५ मिनिटे शिल्लक असताना मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट श्रीलंकेला आंदण दिली. रोहितने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावा केल्या. ५ बाद १३२ वरून पुढे खेळताना नमन ओझा (३५) आणि बिन्नी यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी रचली. बिन्नीला या वेळी पहिल्या अर्धशतकासाठी फक्त एक धाव कमी पडली. ७ बाद १७९ अशी संघाची अवस्था असताना अमित मिश्रा (३९) आणि आर. अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. अश्विनने या वेळी दमदार फलंदाजी करीत सात चौकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली आणि भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर आटोपला.
विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. इशांत शर्मा आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेची २ बाद २ अशी दयनीय अवस्था केली. सातव्या षटकामध्ये इशांतने दिनेश चंडिमलला (१८) कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले आणि श्रीलंकेला २१ धावांवर तिसरा धक्का बसला. त्यानंतर मात्र सलामीवीर कुशल सिल्व्हा (खेळत आहे २४) आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (खेळत आहे २२) यांनी सावधपणे उर्वरित दिवस खेळून काढण्याचे काम चोख बजावले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद २, चेतेश्वर पुजारा नाबाद १४५, अजिंक्य रहाणे पायचीत गो. प्रदीप ८, विराट कोहली झे. परेरा गो. मॅथ्यूज १८, रोहित शर्मा झे. थरंगा गो. प्रसाद २६, स्टुअर्ट बिन्नी पायचीत गो. प्रसाद ०, नमन ओझा झे. थरंगा गो. कौशल २१, रविचंद्रन अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५, अमित मिश्रा यष्टीचीत परेरा गो. हेराथ ५९, इशांत शर्मा त्रि. गो. हेराथ ६, उमेश यादव त्रि. गो. हेराथ ४, अवांतर – १८, एकूण १००.१ षटकांत सर्व बाद ३१२.
बाद क्रम : १-२, २-१४, ३-६४, ४-११९, ५-११९, ६-१७३, ७-१८०, ८-२८४, ९-२९८, १०-३१२.
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद २६-४-१००-४, न्यूवान प्रदीप २२-६-५२-१, अँजेलो मॅथ्यूज १३-६-२४-१, रंगना हेराथ २७.१-३-८४-३, थरिंदू कौशल १२-२-४५-१.
श्रीलंका (पहिला डाव) : उपुल थरंगा झे. राहुल गो. इशांत ४, कौशल सिल्व्हा त्रि. गो. यादव ३, दिम्यूत करुणारत्ने झे. राहुल गो. बिन्नी ११, दिनेश चंडिमल पायचीत गो. बिन्नी २३, अँजेलो मॅथ्यूज झे. ओझा गो. इशांत १, लहिरू थिरिमाने झे. राहुल गो. इशांत ०, कुशल परेरा झे. कोहली गो. इशांत ५५, धम्मिका प्रसाद यष्टीचीत ओझा गो. मिश्रा २७, रंगना हेराथ झे. ओझा गो. इशांत ४९, थरिंदू कौशल पायचीत गो. मिश्रा १६, न्यूवान प्रदीप नाबाद २, अवांतर- १०,
एकूण ५२.२ षटकांत सर्व बाद २०१.
बाद क्रम : १-११, २-११, ३-४०, ४-४५, ५-४७, ६-४७, ६-४८* (प्रसाद, जखमी निवृत्त), ७-१२७, ८-१५६, ९-१८३, १०-२०१.
गोलंदाजी : इशांत शर्मा १५-२-५४-५, उमेश यादव १३-२-६४-१, स्टुअर्ट बिन्नी ९-३-२४-२, आर. अश्विन ८-१-३३-०, अमित मिश्रा ७.२-१-२५-२.
भारत (दुसरा डाव) : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. प्रसाद ०, लोकेश राहुल त्रि. गो. प्रदीप २, अजिंक्य रहाणे पायचीत गो. प्रदीप ४, विराट कोहली झे. थरंगा गो. प्रदीप २१, रोहित शर्मा झे. प्रदीप गो. प्रसाद ५०, स्टुअर्ट बिन्नी झे. थरंगा गो, प्रसाद ४९, नमन ओझा झे. करुणारत्ने गो. हेराथ, अमित मिश्रा धावचीत (सिल्व्हा) ३९, आर. अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५८, उमेश यादव झे. हेराथ गो. प्रदीप ४, इशांत शर्मा नाबाद २, अवांतर (बाइज १, लेग बाइज १, वाइड ३, नो बॉल ५) १०,
एकूण ७६ षटकांत सर्व बाद २७४.
बाद क्रम : १-०, २-२, ३-७, ४-६४, ५-११८, ६-१६०, ७-१७९, ८-२३४, ९-२६९, १०-२७४.
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद १९-३-६४-४, न्यूवान प्रदीप १७-७-६२-४, रंगना हेराथ २२-०-८९-१, अँजेलो मॅथ्यूज ६-३-११-०, थरिंडू कौशल १२-२-४१-०.
श्रीलंका (दुसरा डाव) : उपुल थरंगा झे. ओझा गो. इशांत ०, कुशल सिल्व्हा खेळत आहे २४, दिमुथ करुणारत्ने झे. ओझा गो. यादव ०, दिनेश चंडिमल झे. कोहली गो. इशांत १८, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे २२, अवांतर (लेग बाइज २, नो बॉल १) ३,
एकूण १८.१ षटकांत ३ बाद ६७.
बाद क्रम : १-१, २-२, ३-२१.
गोलंदाजी : इशांत शर्मा ७-२-१४-२, उमेश यादव ५-१-३२-१, स्टुअर्ट बिन्नी ४-१-१३-०, अमित मिश्रा २-०-२-०, आर. अश्विन ०.१-०-४-०.