सुप्रिया दाबके

आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अभावामुळे सायकलिंगमध्ये भारत पिछाडीवर आहे. परिणामी भारताच्या सायकलपटूंना देशभरात मोजक्याच संख्येने होणाऱ्या सायकलिंग स्पर्धामध्ये सहभागावर समाधान मानावे लागते. त्यामुळे ‘टूर डी फ्रान्स’ आणि ऑलिम्पिकसारख्या स्पर्धाचा स्तर भारतीय सायकलपटूंना गाठता येत नाही, या सर्व मुद्यांकडे ‘कनाकिया

स्कॉट रेसिंग डेव्हलपमेट’चे मुख्य सायकलिंग प्रशिक्षक नायजेल स्मिथ यांनी लक्ष वेधले.

‘‘भारतात सायकलिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. कारण प्रायोजक मिळत नाहीत आणि जोडीला त्या दर्जाचे ट्रॅक किंवा सायकलिंग स्पर्धासाठी आवश्यक रस्तेही उपलब्ध नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या सायकल लागतात, त्यादेखील भारतात मिळत नाहीत. लाखांच्या किंमती असणाऱ्या या सायकल स्वित्र्झलडसारख्या युरोपातील देशांमधून आयात कराव्या लागतात,’’ अशा शब्दांत स्मिथ यांनी विश्लेषण केले.

‘‘जगप्रसिद्ध ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीत अजूनही भारताचे सायकलपटू सहभागी झालेले नाहीत, इतकेच नव्हे तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्येही सायकलिंग प्रकारात भारताला पदकाची अपेक्षा करता येत नाही. या स्तरापर्यंत भारतीय सायकलपटूंना सुधारणा करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागेल,’’ असे मत स्मिथ यांनी व्यक्त केले आहे. मूळचे इंग्लंडचे असणारे स्मिथ हे सध्या नाशिकच्या या केंद्रात सायकलपटूंना मार्गदर्शन करतात.

‘‘टूर डी फ्रान्ससारख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताच्या खेळाडूला वयाच्या पाचव्या वर्षांपासून तयारी करावी लागेल. कारण टूर डी फ्रान्ससारख्या स्पर्धेत सहभागासाठी विविध टप्प्यांची तयारी करावी लागते. डोंगरदऱ्यांमधून सायकल चालवणे, यासारख्या टप्प्यांवरील सराव आवश्यक असतो,’’ असे स्मिथ यांनी सांगितले.

ऑलिम्पिकबाबत भाष्य करताना स्मिथ म्हणाले, ‘‘ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याकरिता ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’च्यावतीने (यूसीआय) आयोजित जागतिक मानांकन स्पर्धामध्ये सहभागी होऊन पदके जिंकणे आवश्यक आहे. सध्याची जर सायकलपटूंची कामगिरी पाहिली तर ऑलिम्पिकचे लक्ष्य ठेवण्यापेक्षा आशियाई क्रीडा स्पर्धेवर लक्ष ठेवण्याला प्राधान्य आहे.’’ कझाकस्तान, श्रीलंका, हॉँगकॉँग यासारख्या देशांशी आधी भारताला सायकलिंगमध्ये स्पर्धा करावी लागेल आणि मगच पुढचा टप्पा गाठावा लागेल.’’

नाशिक येथे स्मिथ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक येथे स्मिथ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कनाकिया स्कॉट रेसिंग’कडून निवडक चार मुलांना कसून प्रशिक्षण देण्यात येत आहे. सन्रेश शेडेकर, दिलीपन राज, सरोश मुंड्रोनिया, मिहीर जाधव या चार मुलांची निवड सायकलिंग स्पर्धाच्या तयारीसाठी झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल, तसेच त्यासाठी लागणारा गणवेश, बूट, आहार आदी साहित्यही या मुलांना देण्यात आले आहे. सन्रेश, दिलीपन, सरोश, मिहीर या चारही मुलांनी ‘यूसीआय’च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासह ऑलिम्पिकचे प्रतिनिधित्व करण्याची जिद्द बोलून दाखवली. त्याचवेळेला देशभरात सायकलिंगच्या स्पर्धा कमी असल्याने सरावाची संधी विशेष मिळत नसल्याची खंतही या चौघा सायकलपटूंनी बोलून दाखवली.