भुवनेश्वर : भारतीय वरिष्ठ पुरुष संघाला रविवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या सामन्यात स्पेनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेच्या गेल्या हंगामात तिसरे स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाला स्पेनविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करता आली नाही.

एडवार्ड डी इग्नासिओ-सिमो (१६व्या मिनिटाला) आणि मार्क मिरालेस (२६व्या मि.) यांनी केलेल्या गोलमुळे स्पेनला सामन्यात २-० अशी आघाडी मिळाली. मात्र, भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. कर्णधार हरमनप्रीत सिंग (२६व्या मि.) आणि अभिषेक (५४व्या मि.) यांनी गोल करत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. परंतु, ५६व्या मिनिटाला मार्क रेनेने केलेल्या गोलमुळे स्पेनने हा सामना ३-२ अशा फरकाने जिंकला.

या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या बचाव फळींनी चांगला खेळ केला. मात्र, दुसऱ्या सत्रात सामन्यात रंगत निर्माण झाली. भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने स्पेनचा पेनल्टी कॉर्नर अडवला, पण चेंडू फार दूर गेला नाही. इग्नासिओ-सिमोने याचा फायदा घेत स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पेनल्टी कॉर्नरवर मिरालेसने स्पेनचा दुसरा गोल केला. भारतीय संघाने मग आक्रमणाची गती वाढवली. हरमनप्रीतने गोल करत स्पेनची आघाडी कमी केली, तर अभिषेकने अखेरच्या सत्रात भारताला बरोबरी करून दिली. मात्र, सामना संपण्यासाठी चार मिनिटे शिल्लक असताना रेनेने गोल केल्यामुळे स्पेनला विजय मिळवण्यात यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.