दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावूनही आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताने आपले दुसरे स्थान टिकवले आहे. याचप्रमाणे फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.
दक्षिण आफ्रिकेने आपले तिसरे स्थान पुन्हा प्राप्त केले असले, तरी भारतापासून ते फक्त दोन गुणांनी पिछाडीवर आहेत. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये पाच गुणांचा फरक होता. मात्र ए बी डी’व्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली. फलंदाजांच्या क्रमवारीत डी’व्हिलयर्सने अव्वल स्थान गाठले आहे. तर कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. हशिम अमलाची तीन स्थानांनी घसरण झाली असून, तो पाचव्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीने तीन स्थानांनी आगेकूच केली असून, तो पाचव्या स्थानावर आहे.
