भारताचा किदम्बी श्रीकांत आणि सिंगापूरचा लोह किन येव यांच्यातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या इंडिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेत हे खेळाडू उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

११ ते १६ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या इंडिया खुल्या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका बुधवारी जाहीर करण्यात आली. पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत अव्वल मानांकित श्रीकांतपुढे भारताच्याच सिरील वर्माचे आव्हान असेल. त्याला उपांत्य फेरी गाठण्यात यश आल्यास त्याचा जगज्जेत्या येवशी सामना होऊ शकेल. तसे झाल्यास श्रीकांतचा जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असेल. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनचा पहिल्या फेरीत इजिप्तच्या अदहम एल्गामलशी सामना होईल.

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूचा महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत श्री कृष्णा प्रिया कुदारावल्लीचे आव्हान असेल. तसेच सायना नेहवालची वाट खडतर असून उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित इरिस वांग, तर उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित बुसानन ओंगबमरुंगपानशी दोन हात करावे लागू शकतील.