सुर्यकुमारचा षटकार, विराटच्या अर्धशतकाला सर्वाधिक Views; Disney प्लस Hotstar च्या कमाईची आकडेवारीही आली समोर

सामन्याची व्ह्यूअरशीप सामन्याच्या शेवटाकडे मोठ्या प्रमाणात घसरली, मात्र चमत्काराच्या अपेक्षेने शेवटच्या चेंडूपर्यंत ७८ लाख जण सामना पाहत होते

India Pakistan match digital viewership
या सामन्यामध्ये व्ह्यूअरशीपचे विक्रम मोडले गेले नसले तरी प्रेक्षकांची संख्या ही फार जास्त होती असं म्हणता येईल.

टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान डिन्से प्लस हॉटस्टारवर व्ह्यूअरशीपचा नवा विक्रम नोंदवण्यात आलाय. दुबईमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना पाहण्यासाठी टी २० विश्वचषकाचे अधिकृत टेलिकास्ट पार्टनर असणाऱ्या डिस्ने-हॉटस्टारवर एका क्षणाला तब्बल १ कोटी २० लाख प्रेक्षक सामना पाहत होते. रविवारी आबू धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्याची व्ह्यूअरशीप सामन्याच्या शेवटाकडे मोठ्या प्रमाणात कमी झाली. पाकिस्तानने भन्नाट फलंदाजी करत एकही विकेट न गमावता सामना १० विकेट्सने जिंकला. पाकिस्तान विजयाकडे आगेकूच करत असताना भारतीय चाहते मात्र सामना पाहणं बंद करत असल्याचं या ट्रेण्डवरुन दिसून आलं.

पहिली विकेट गमावली तेव्हा होते ८० लाख प्रेक्षक
सामना सुरु झाल्याच्या क्षणापासूनच आयपीएलच्या अंतिम सामन्याला मिळालेल्या व्ह्यूअपशीपपेक्षा अधिक व्ह्यूअरशीप या सामन्याला होती. काही आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान सर्वाधिक प्रेक्षक संख्या ही ७६ लाख इतकी होती. ७६ लाख हा आयपीएलमधील सर्वाधिक व्ह्यूअरशीपचा आकडा होता. मात्र भारत पाक सामन्यादरम्यान पहिल्या दोन चेंडूंच्या वेळी प्रेक्षक संख्या ४१ लाखांवरुन थेट ५९ लाखांवर गेली. भारताने रोहित शर्माच्या रुपाने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली तेव्हा ८० लाख लोकं या अॅपवरुन सामना पाहत होते. सातव्या चेंडूला तर ८५ लाख प्रेक्षक एकाच वेळी या माध्यमातून सामना पाहत होते.

सुर्यकुमारचा तो षटकार अन्…
रोहित शर्मा पाठोपाठ के. एल. राहुलही तंबूत परतल्याने भारतीय संघ दबावाखाली आला. शाहीन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज चाचपडताना दिसले. सुर्यकुमार यादवने लेग साईडला लगावलेला षटका हा भारतीय संघाला आशा देणारा ठरला त्याप्रमाणे तो डिस्ने हॉटस्टारलाही उभारी देणार ठरला. सुर्यकुमारने तो षटकार लगावताच प्रेक्षक संख्या ९१ लाखांवर गेली. त्यानंतर पहिल्या १५ चेंडूंमध्ये प्रेक्षकसंख्येने ९७ लाखांचा उच्चांक गाठला. हा आकडा आयपीएलच्या १३ व्या पर्वामध्ये पार पडलेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई या पहिल्या सामन्यात मिळालेल्या सर्वाधिक व्ह्यूअरशीपपेक्षा अधिक होता. त्यावेळी ८७ लाख लोक एकाच वेळी सामना पाहत होते.

विराटच्या अर्धशतकाच्या वेळेस उच्चांक…
भारताचे फलंदाज त्यातही खास करुन कर्णधार विराट कोहली पाकिस्तानी गोलंदाजांसमोर एकटा झुंज देत असताना भारताच्या फलंदाजीच्या १५ व्या षटकामध्ये प्रेक्षक संख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला. विराटने १५.४ व्या चेंडूवर चौकार लगावला तेव्हा प्रेक्षकसंख्या १ कोटी १० लाखांवर पोहचली. विराटने १६ व्या षटकामध्ये आपलं अर्धशतक साजरं केलं तेव्हा प्रेक्षकसंख्येने उच्चांक गाठत १ कोटी २० लाखांपर्यंत झेप घेतली.

विक्रम नाही पण…
आयपीएलच्या १२ व्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळुरु सामन्यामध्ये डिन्से प्लस हॉटस्टारने १ कोटी २० लाखांचा टप्पा गाठलेला. याच पर्वाच्या अंतिम सामन्यात १ कोटी ८० लाखांचा टप्पा गाठण्यात यश आलं होतं. यंदाचा सामना चुरशीचा न झाल्याने या सामन्याने व्ह्यूअपशीपचे विक्रम मोडले नसले तरी विक्रमी कामगिरीच्या आसपास या सामन्यातील व्ह्यूअपशीप नक्कीच आली.

पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी घसरण…
पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान पहिल्या तीन षटकांमध्ये प्रेक्षकांची संख्या ९० लाखांवर आली. त्यानंतर शेवटच्या षटकाला प्रेक्षकांची संख्या ७८ लाख इतकी होती. यावरुच अगदी शेवटच्या क्षणी तरी चमत्कार होईल या अपेक्षेने तब्बल ७८ लाख प्रेक्षक हा सामना या अॅपवर पाहत असल्याचं स्पष्ट होतं आहे.

कमाई किती झाली?
व्ह्यूअपशीपबरोबरच या सामन्यामधून डिस्ने प्लस हॉटस्टारची चांगली कमाई झाली असल्याचं बोललं जात आहे. मनी कंट्रोलने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या सामन्यातून या प्लॅटफॉर्मने तब्बल ३०० कोटींची कमाई केली आहे.

यंदा गाठणार १००० कोटींचा आकडा…
सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारकडेच आयपीएल आणि टी २० विश्वचषकाच्या प्रसारणाचे हक्क आहेत. त्यांनी मागील वर्षी ८०० कोटींची कमावई केली होती. यंदा ते एक हजार कोटींच्या कमाईचा टप्पा गाठतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India pakistan match dial up digital viewership disney plus hotstar sees more viewers than ipl 14 scsg

ताज्या बातम्या