कोलंबो : उदयोन्मुख आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील द्वंद्व आज, रविवारी पाहायला मिळणार आहे. भारत ‘अ’ संघाने साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केले. तसेच संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत अंतिम फेरी गाठल्याने भारताचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड मानले जात आहे.
भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अडचणीत सापडला होता. या सामन्यात भारतीय संघाला २११ धावाच करता आल्या. बांगलादेशच्या सलामी फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात दिली होती. १८व्या षटकांपर्यंत बांगलादेश संघ १ बाद ९४ अशा सुस्थितीत होता. यानंतर भारतीय फिरकीपटू निशांत सिंधू आणि मानव सुथार यांनी अचूक टप्प्यावर मारा करताना बांगलादेशचा डाव १६० धावांवर संपुष्टात आणला. आव्हानात्मक खेळपट्टीवर कर्णधार यश धूलची ६६ धावांची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली. भारताकडून आतापर्यंत सर्वच खेळाडूंनी वेळोवेळी योगदान दिले आहे आणि पाकिस्तानविरुद्धही आपली हीच कायम राखण्याचा ते प्रयत्न करतील.
पाकिस्तान ‘अ’ संघातील काही खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय सामने आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अष्टपैलू मोहम्मद वसीम, कर्णधार मोहम्मद हॅरिस, सलामीवीर साहिबजादा फरहान आणि गोलंदाज अर्शद इक्बाल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. तर, अमाद बट आणि युसूफ यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये चमक दाखवली आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक करणार नाही.