जयपूरमध्ये ३६० एवढय़ा प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्या लढतीत सहज पराभूत झालेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास या संस्मरणीय विजयाने उंचावला आहे. या आत्मविश्वासाच्या बळावरच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयी आगेकूच करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३५९ धावा करूनही पराभव पदरी पडलेला ऑस्ट्रेलियाचा संघ या दारुण पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना या लढतीच्या निमित्ताने दर्जेदार क्रिकेटची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.
मोहालीच्या मैदानावरच शिखर धवनने कसोटी पदार्पणातच शतक झळकावले होते. या मैदानावर आणखी एक दिमाखदार खेळी करण्यासाठी धवन आतूर आहे. ऐतिहासिक विजयात सामनावीर ठरलेल्या रोहित शर्मावर कामगिरीत सातत्य ठेवण्याची जबाबदारी आहे. विराट कोहलीकडून पुन्हा एकदा तडाखेबंद खेळीची अपेक्षा आहे. अनुभवी युवराज सिंग, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी फलंदाजीत योगदान देण्यासाठी सज्ज आहेत.
भारतीय संघासाठी गोलंदाजी हा मात्र कच्चा दुवा ठरला आहे. अनुभवी इशांत शर्मा लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. त्याच्या जागी जयदेव उनाडकट किंवा शमी मोहम्मद यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. हाणामारीच्या षटकांत भारतीय गोलंदाजांची कामगिरी हा कर्णधार धोनीसाठी चिंतेचा विषय आहे. रविचंद्रन अश्विन बळी टिपण्यात यशस्वी ठरतोय; मात्र धावा रोखण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ नव्याने सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरोन फिन्च, जॉर्ज बेली, शेन वॉटसन जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ग्लेन मॅक्सवेलला मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. फिलीप ह्य़ुजेसला सूर गवसल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. अ‍ॅडम व्होग्सच्या जागी कॅलम फग्र्युसनला संधी मिळू शकते. धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान मिचेल जॉन्सन, क्लिंट मकॉय, जेम्स फॉल्कनर या त्रिकूटासमोर आहे.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स, डीडी नॅशनल.
वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.