बँकॉक : गोळाफेक प्रकारामधील भारताची आघाडीची महिला खेळाडू आभा खाटुआने १८.०६ मीटरची फेक करताना राष्ट्रीय विक्रमाच्या बरोबरीसह आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले. त्याच वेळी ज्योती याराजी आणि पारुल चौधरी यांनी स्पर्धेतील दुसऱ्या पदकाची कमाई केली. भारताने २७ पदकांसह स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रविवारी आभाने (१७.१३ मीटर) वैयक्तिक कामगिरीत तब्बल ९३ सेंटिमीटरची सुधारणा करताना आपल्या चौथ्या प्रयत्नात १८.०६ मीटर अंतरावर गोळा फेकला. आभाची ही कामगिरी राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करणारी ठरली. मात्र, सुवर्णपदकापासून आभा ८२ सेंटिमीटरने दूर राहिली. चीनच्या सोंग जियायुआनने सुवर्णपदक मिळवले. आभाने अनुभवी मनप्रीत कौरच्या विक्रमाशी बरोबरी केली. मनप्रीत या स्पर्धेत १७ मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.
आशियाई स्पर्धेत १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला धावपटू ठरलेल्या ज्योतीने दुसरे पदक जिंकताना २०० मीटर शर्यतीत २३.१३ सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक पटकावले. भारताची लांब पल्ल्याची धावपटू पारुलने ३ हजार स्टीपलचेस शर्यतीमधील सुवर्णपदकानंतर ५ हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. पारुलने १५ मिनिटे ५२.३५ सेकंद अशी वेळ दिली. जपानची युमा यामामोटो
(१५ मिनिटे ५१.१६ सेकंद) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. भारताची अंकिता (१६ मिनिटे ०३.३३ सेकंद) कांस्यपदकाची मानकरी ठरली.
अखेरच्या दिवशी भारताचे यश
’ पुरुषांच्या भालाफेक प्रकारात डी. पी. मनूला (८१.०१ मीटर) रौप्य
’ गुलवीर सिंगला ५ हजार मीटर शर्यतीत (१३ मिनिटे ४८.३३ सेकंद) कांस्यपदक
’ किशन कुमार (१ मिनिट ४५.८८ सेकंद), के.एम. चंदा (२ मिनिटे १.५८ सेकंद) यांना ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक
’ पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत अमोज जेकब, मोहम्मद अजमल, मिजो कुरियन चाको, राजेश रमेश या चमूला (३ मिनिटे १.८० सेकंद) रौप्यपदक
’ महिला ४ बाद ४०० मीटर रिले शर्यतीत रेझोआना मल्लिक हिना, ऐश्वर्या मिश्रा, ज्योतिका दंडी, सुभा वेंकटेशन हा चमू (३ मिनिटे ३३.७३ सेकंद) कांस्यपदकाचा मानकरी
’ २० किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामीला (१ तास ३४ मिनिटे २४ सेकंद) रौप्य, विकास सिंगला (१:२९.३२ सेकंद) कांस्यपदक
