India Squad for England Tour Announcement Update: आयपीएल २०२५ संपल्यानंतर, टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासह, भारतीय संघ नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात देखील करेल. भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्यासह टीम इंडियाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अचानक कसोटी निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कसा असणार आहे, यावर सर्वांच्या नजरा आहेत. याशिवाय इंग्लंड कसोटी मालिका टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहे. तर रोहित आणि विराटची जागा कसोटी मालिकेत कोण घेणार, यासाठी सर्वच उत्सुक आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठीचा संघ कधी जाहीर होणार, याची तारीख समोर आली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती येत्या शनिवारी म्हणजेच २४ मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करू शकते. ज्यामध्ये भारताच्या नवीन कर्णधाराचीही घोषणा केली जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घोषणा होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारत नवीन कसोटी कर्णधाराच्या शोधात आहेत. तेव्हापासून, या भूमिकेसाठी अनेक संभाव्य खेळाडूंची नावे देण्यात आली आहेत, ज्यात जसप्रीत बुमराह, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. पण वृत्तानुसार, बुमराहने या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गिल आणि पंत आघाडीवर आहेत.

दुखापतीमुळे बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर बुमराह मैदानावर परतला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंडमध्ये बुमराह पाचही कसोटी सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. गिल आणि पंत यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर बीसीसीआयने रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव द्यायचे याबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे २० मे रोजी वृत्त आले होते.

स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांपैकी एका निवडकर्त्याला गिलला कर्णधारपद देण्याबाबत आक्षेप होता, कारण त्याला अद्याप कसोटी संघातील मिळवलेले स्थान सिद्ध करू शकलेला नाही. असे सुचवण्यात आले होते की उपकर्णधारपद हे २५ वर्षीय खेळाडूसाठी सध्या चांगलं ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड दौरा हा भारतासाठी नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात असेल. आर. अश्विन, रोहित आणि विराट कोहली सारख्या खेळाडूंनी संघातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान मिळणार आहे. भारत अ संघ इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार असल्याने भारताच्या सिनियर कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी चुरशीची स्पर्धा आहे. करुण नायर, इशान किशन आणि इतर खेळाडू इंग्लंड लायन्सविरुद्ध कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे आणि त्यानंतर भारताच्या सिनियर संघाबरोबर वॉर्म अप सामना खेळवला जाईल.