Asia Cup 2025 India Squad Announcement: वाद–विवादांच्या भोवऱ्यात सापडलेला आशिया चषक अखेर येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठीचा १५ सदस्यीय भारतीय संघ आज, १९ ऑगस्टला जाहीर केला जाणार आहे. एवढंच नव्हे, तर आजच वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मंगळवारी दुपारी मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयात सभा झाल्यानंतर याची घोषणा केली जाईल, जिथे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या संघाची घोषणा करतील. त्याचबरोबर महिलांच्या वनडे विश्वचषकासाठी देखील आज संघाची घोषणा करण्यात येणार आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

निवड समितीच्या बैठकीला सुरूवात, किती वाजता सुरू होणार पत्रकार परिषद?

आशिया चषकासाठी निवड समितीच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बीसीसीआयने फोटो शेअर करत याची माहिती दिली. या बैठकीला भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव, निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि निवड समितीतील इतर सभासद उपस्थित आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 2.45 ला पत्रकार परिषद सुरू होणार आहे.

आशिया चषकासाठी संघ उशिरा जाहीर होणार

मुंबईतील मुसळधार पावसामुळे आज आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या घोषणेला विलंब होत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया बैठकीसाठी अद्याप न पोहोचल्याने बैठक सुरू झालेली नाही. भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव बैठकीसाठी पोहोचला आहे. तर महिला वनडे वर्ल्डकपसाठी संघ जाहीर होणार आहे, त्याकरता स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरदेखील बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये पोहोचले आहेत.

भारताचा टी-२० कर्णधार मिटिंगसाठी बीसीसीआय ऑफिसमध्ये दाखल

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी असतानाही भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव वेळेआधीच बीसीसीआय ऑफिसमध्ये दाखल झाला आहे. आशिया चषक २०२५ साठी भारताच्या संघ निवडीची बैठक बीसीसीआय ऑफिसमध्ये होणार आहे.

निवड समितीच्या पत्रकार परिषदेला उशिरा सुरूवात होणार

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा परिणाम आजच्या बीसीसीआयच्या बैठकीवर देखील झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आज संघ निवडीची घोषणा लांबणीवर पडू शकते.

महिला वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची आज घोषणा

आशिया चषकानंतर ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक २०२५ साठी घोषणा करणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक १२ वर्षांनी भारतात होणार आहे. यापूर्वी भारताने २०१३ मध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी भारत गट टप्प्यातच बाहेर पडला होता. भारतात होणाऱ्या या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार बनू शकते.

स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची संघात निवड होईल हे जवळजवळ निश्चित आहे. याचबरोबर गोलंदाजीत आणि मधल्या फळीत कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. १९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या निवड बैठकीनंतर विश्वचषकासाठी अंतिम संघ जाहीर केला जाईल.

आशिया चषकासाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी?

आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करणं निवडकर्त्यांसाठी मोठं अवघड आव्हान असणार आहे. ३-४ खेळाडूंच्या नावाबद्दल मोठी चर्चा आहे. कसोटीत चांगली कामगिरी करणारे खेळाडू टी-२० संघाचा भाग नव्हते. त्यामुळे नेमकी संधी कोणाला द्यायची हा मोठा यक्षप्रश्न निवडकर्त्यांना सोडवायचा आहे.

कसोटी कर्णधार शुबमन गिल आणि युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ही दोन सर्वात महत्त्वाची नाव आहेत. दोघांनीही आंतरराष्ट्रीय ते आयपीएलपर्यंत टी-२० स्वरूपात आपलं कौशल्य दाखवलं आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून ते दोघेही कसोटी संघात महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि त्यामुळे टी-२० संघापासून दूर होते. पण दोघांनीही इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत चांगला फॉर्म दाखवला आणि त्याआधी त्यांनी आयपीएल २०२५ मध्येही भरपूर धावा केल्या. पण सध्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीला बदलण्याची शक्यता कमी दिसत आहे.

गिल-जैस्वालशिवाय श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंहला संधी मिळणार का यावरही नजरा आहेत. श्रेयस अय्यरने गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत कर्णधार आणि खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी विजयातही मोठी भूमिका बजावली होती. पण मधल्या फळीत त्याला संधी मिळणार का हा प्रश्नही आहे. तर रिंकू सिंहच्या कामगिरीत चढउतार पाहायला मिळाला आहे.