बीसीसीआयने नुकतेच परदेशी दौऱ्यांवर खेळाडूंच्या सामानाचे वजन मर्यादित करणारे नवीन नियम लागू केले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक प्रकरण समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एका खेळाडूने अंदाजे २७ बॅग नेल्या होत्या, ज्यांचे वजन २५० किलोपेक्षा जास्त होते. ज्याचे अतिरिक्त पैसे बीसीसीआयला भरावे लागले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याशी संबंधित एका बातमीने खळबळ उडवून दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा एक खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याच्याबरोबर २७ बॅग आणि ट्रॉली बॅग घेऊन गेला होता, ज्यामध्ये त्याच्या १७ बॅट आणि कुटुंबासह वैयक्तिक स्टाफच्या वस्तू होत्या. या सामानाचे वजन सुमारे २५० किलो होते. ऑस्ट्रेलियातही हा खेळाडू हे सामान घेऊन सर्वत्र फिरत होता. त्यामुळे बीसीसीआयचा खर्चही लाखोंनी वाढला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ही बातमी समोर आल्यापासून चाहते विचारत आहेत की, हा खेळाडू भारतीय कर्णधार रोहित शर्मा होता की स्टार फलंदाज विराट कोहली? दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, खेळाडूच्या वैयक्तिक सामानाव्यतिरिक्त, या बॅगमध्ये त्याचे कुटुंब आणि कर्मचारी सदस्यांचे सामान देखील होते, ज्याचा खर्च बीसीसीआयने केला होता.

अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की संपूर्ण दौऱ्यात खेळाडूचे कुटुंब त्याच्याबरोबर राहिले आणि संपूर्ण दौऱ्यात त्याचे सामान भारतातून ऑस्ट्रेलिया आणि परत तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्याचा खर्च बीसीसीआयला करावा लागला. किती खर्च झाला याचा खुलासा झाला नसला तरी ही खर्च लाखोंचा असेल असे अनुमान लावण्यात येत आहे.

बीसीसीआयने या घटनेनंतर भविष्यात केवळ १५० किलोपर्यंतच्या वस्तूंचा खर्च उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय खेळाडूंना आता सामन्यांसाठी सांघिक बसने प्रवास करावा लागेल आणि वैयक्तिक प्रवास व्यवस्थेला परवानगी नसेल.

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही बीसीसीआयने कठोर भूमिका घेत खेळाडूंच्या कुटुंबीयांना त्यांच्याबरोबर प्रवास करण्यास नकार दिला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका सिनियर खेळाडूने तर आपल्या पत्नीला दुबईला घेऊन जाण्याबाबत बोर्डाशी चर्चा केली होती. मात्र नियम सर्वांसाठी सारखेच असतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे कोणताही खेळाडू स्पर्धेदरम्यान शेफ, पर्सनल मॅनेजर, ट्रेनर, सेक्रेटरी किंवा कोणताही सहाय्यक यांसारख्या वैयक्तिक स्टाफला घेऊन जाऊ शकत नाही. त्याच वेळी, खेळाडूंना संपूर्ण सराव सत्रात एकत्र राहावे लागेल आणि सामन्याच्या ठिकाणापर्यंत एकत्र प्रवास करावा लागेल. आता टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला विमान प्रवासादरम्यान १५० किलोपेक्षा जास्त सामान नेण्याची परवानगी नाही. यापेक्षा जास्त सामान असल्यास खेळाडूला अतिरिक्त रक्कम स्वतः एअरलाइन्सला द्यावी लागेल.