दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर ६३ धावांनी मात करत मालिकेचा अखेर गोड केला आहे. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने जिंकली असली, तरीही कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी आणि शेवटच्या कसोटी सामन्यातला विजय हा भारताला वन-डे आणि टी-२० मालिकेत प्रेरणादायी ठरणार आहे. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे भारताने कसोटीच्या चौथ्या दिवशीच सामना खिशात घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने एक गडी गमावला होता. मात्र अखेरच्या षटकांमध्ये खेळपट्टीतल्या अनपेक्षित उसळीमुळे खेळ थांबवण्यात आला. चौथ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रांमध्ये हाशिम आमला आणि डीन एल्गर यांनी मोठी भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र इशांत शर्माने हाशिम आमलाला बाद करुन आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली. यानंतर आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकले नाहीत. मोहम्मद शमीने आफ्रिकेची उरलेली फळी कापून काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मोहम्मद शमीने घेतलेल्या ५ बळींशिवाय जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी २-२ खेळाडूंना बाद केलं. फलंदाजीत दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांनी केलेल्या अर्धशतकी आघाडीमुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. या दोघांच्या भागीदारीमुळे जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर भारत आफ्रिकेसमोर विजयासाठी २०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान ठेवू शकला. कसोटी मालिकेनंतर भारत आणि आफ्रिका यांच्यात ६ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची खेळवली जाणार आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यातला पहिला वन-डे सामना १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of south africa 2018 india beat south africa by 63 runs in johannesburg test
First published on: 27-01-2018 at 21:07 IST