दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुंगी निगडीने केलेल्या भेदक माऱ्यासमोर सेंच्युरिअन कसोटीत भारताचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दुसऱ्या डावात आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १५१ धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताचा एकही फलंदाज आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. सेंच्युरिअनच्या उसळत्या खेळपट्टीवर भारताचे फलंदाज एकामागोमाग एक विकेट बहाल करत केले. मधल्या फळीत रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने अर्धशतकी भागीदारी करुन भारताचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर त्यांची डाळ शिजली नाही.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी निगडीव्यतिरीक्त कगिसो रबाडाने ३ बळी घेतले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सेंच्युरिअन कसोटीत भारताचं क्षेत्ररक्षण हे सुमार दर्जाचं पहायला मिळालेलं आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन्ही डावात काही सोपे झेल टाकत गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. त्यामुळे आगामी कसोटीत आपल अस्तित्व टिकवण्यासाठी विराट कोहली भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. या मालिकेतली तिसरी कसोटी २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.

  • भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात १३५ धावांनी पराभूत, कसोटी मालिकाही गमावली
  • भारताचा अखेरचा फलंदाज माघारी, जसप्रीत बुमराह निगडीच्या गोलंदाजीवर बाद
  • पाठोपाठ मोहम्मद शमी माघारी, भारताला नववा धक्का
  • भारताला आठवा धक्का, भारत पराभवाच्या जवळ
  • मात्र रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा माघारी
  • मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा जोडीची अर्धशतकी भागीदारी
  • रोहित शर्मा – मोहम्मद शमी जोडीकडून चौफेर फटकेबाजी
  • भारताने ओलांडला शंभर धावांचा टप्पा
  • पाठोपाठ रविचंद्रन आश्विन माघारी, भारताला सातवा धक्का
  • क्विंटन डी-कॉककडे झेल देत पांड्या माघारी, भारताचा सहावा गडी माघारी
  • निगडीच्या गोलंदाजीवर पांड्याची पुन्हा हाराकिरी, उसळत्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न
  • हार्दिक पांड्या – रोहित शर्मा जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • १०० धावांच्या आत भारताचा निम्मा संघ माघारी
  • रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात पार्थिव पटेल माघारी
  • पार्थिव पटेलकडून सुरेख फटकेबाजी, शर्मा-पटेल जोडीकडून प्रतिकाराचा प्रयत्न
  • तीन धावा काढत असताना भरवशाचा चेतेश्वर पुजारा माघारी, भारताला चौथा धक्का
  • पहिल्या सत्रात भारताची सुरुवात अडखळती
  • पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात