भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ICC Code of Conduct Level 1 चा भंग केल्याप्रकरणी विराटला त्याच्या मानधनातल्या २५ टक्के रकमेवर पाणी सोडावं लागणार आहे.

अवश्य वाचा – विराटच्या आक्रमकतेचा आमच्यावर परिणाम नाही- मोर्केल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटीत सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्याशी हुज्जत घातल्याच्या कारणावरुन विराटला ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सेंच्युरिअन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. यावेळी मैदानाचा काही भाग ओलसर असल्यामुळे चेंडु सतत ओला होऊन गोलंदाजांना याचा त्रास होत असल्याची तक्रार कोहलीने मैदानातील पंचांकडे केली. यानंतर अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. मात्र पंचांच्या भूमिकेवर नाराज झालेल्या कोहलीने थेट सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या कक्षात जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम ब्रॉड यांच्या कक्षात दाखल झाले. यादरम्यानच्या चर्चेत कोहली आणि ब्रॉड यांच्यात खटके उडाल्याचंही समजतं आहे. याप्रकरणाची दृष्य माध्यमांसमोर आल्यानंतर आयसीसीने विराटवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.