भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तिन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेकडून भारताला जरासाही प्रतिकार झाला नाही. कोलंबो आणि कँडी कसोटीत श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. प्रत्येक वेळी काही ठरावीक फलंदाजांचा अपवाद वगळता सर्व श्रीलंकन खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली आहे. “त्यामुळे दिनेश चंडीमलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेच्या कसोटी संघाला भारतामधला सर्वोत्तम रणजी संघही हरवू शकेल”, अशी टीका गावसकर यांनी केली आहे.

“प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, या मालिकेत झालेल्या एकाही सामन्याला तुम्ही कसोटी क्रिकेटचा खेळ म्हणू शकणार नाही. प्रत्येक सामने हे एकतर्फी झालेले आहेत. एकाही कसोटीत भारताचा कस लागला नाही, श्रीलंकेच्या संघाने जरासाही प्रतिकार न केल्यामुळे भारताला विजय मिळवणं हे सोप्प होतं गेलं. त्यामुळे भारतामधला रणजी क्रिकेट खेळणारा संघदेखील श्रीलंकेच्या संघाला सहज हरवेल.” दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सोनी लिव्ह वाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात गावसकर यांनी आपलं मत मांडलं आहे.

भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनीही श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेवर, लंकेकडून होणाऱ्या प्रतिकाराबद्दल आपलं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

याव्यतिरीक्त सुनिल गावसकर यांनी पहिल्या डावात कुलदीप यादवने केलेल्या गोलंदाजीचं कौतुक केलं. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीने दुसरी कसोटी खेळायची संधी मिळाल्यानंतरही कुलदीपने चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक वेळा मिळालेल्या संधीचं कुलदीपने सोनं केलं आहे. त्यामुळे आगामी काळात कुलदीपकडून भारताला मोठ्या आशा असल्याचं, गावसकर म्हणाले. कसोटी मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ वन-डे आणि १ टी-२० सामन्याची मालिका होणार आहे. त्यामुळे या मालिकेततरी श्रीलंकेचा संघ भारताला टक्कर देतो का ते पहावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी संघ जाहीर, पालघरच्या शार्दुल ठाकूरचा संघात समावेश