कोलंबो : पहिल्या दोन सामन्यांतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आज, बुधवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय अनिवार्य आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ तब्बल २७ वर्षांनी भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे. त्यामुळे या नव्या पर्वाची किमान बरोबरीने सुरुवात करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताने श्रीलंकेविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका १९९७ मध्ये गमावली होती. अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने सचिन तेंडुलकरच्या भारतीय संघाला ०-३ असे नमवले होते. त्यानंतर उभय संघांत ११ एकदिवसीय मालिका झाल्या आणि प्रत्येक वेळी भारतीय संघच विजेता ठरला. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताला ३२ धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

हेही वाचा >>> Paris Olympics 2024: विनेश फोगटने अंतिम फेरीत धडक मारत घडवला इतिहास; ही कामगिरी करणारी ठरली पहिली महिला कुस्तीपटू

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा भारतीय संघाला फटका बसला आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना चांगली मदत मिळत आहे आणि याचा श्रीलंकेने पुरेपूर फायदा घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना फिरकीचा सामना करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. तारांकित फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ ३८ धावा केल्या आहेत. फिरकीपटूंसमोर तो चाचपडताना दिसत आहे. त्यामुळे फलंदाजीत अधिक आक्रमकता आणत श्रीलंकेच्या फिरकीपटूंवर दडपण आणण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल. फिरकीपटूंविरुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवम दुबेला गेल्या सामन्यात जेफ्री वांडरसेने निष्प्रभ केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस, राहुलची चिंता

मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या कामगिरीची भारताला चिंता असेल. या दोघांनाही श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध खेळताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राहुलला गेल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. श्रेयसला दोन सामन्यांत मिळून ३० धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे दोघांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. तसेच फलंदाजी भक्कम करण्याच्या दृष्टीने शिवम दुबेच्या जागी रियान परागला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. तो उपयुक्त फिरकी गोलंदाजही आहे. फलंदाजासाठी भारताकडे ऋषभ पंतचा पर्यायही आहे.