INDU19 vs AUS U19 Youth Test series win: भारताच्या अंडर-१९ संघाने ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघाविरूद्ध दणदणीत मालिका विजय मिळवला आहे. भारताच्या वरिष्ठ संघाच्या दौऱ्यापूर्वी अंडर-१९ संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या घरच्या मैदानावर त्यांचा दारूण पराभव केला आहे. भारतीय अंडर-१९ संघाने दुसऱ्या युथ कसोटीत विजय मिळवला आणि कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाचा २-० असा धुव्वा उडवला. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट सलग पाचव्या विजयाने झाला.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या १९ वर्षांखालील कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. दुसऱ्या बहुदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने फक्त तीन गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयात संपूर्ण भारतीय अंडर-१९ संघाचे योगदान होते. चौदा वर्षीय स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीनेही या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने संपूर्ण मालिकेत १३३ धावा केल्या.
मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या युथ कसोटी सामन्यात भारतीय अंडर-१९ संघाने ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघ पहिल्या दिवशी १३५ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही, पण संघाने ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक धावा केल्या. टॉप-ऑर्डरच्या अपयशानंतर, खालच्या फळीतीली फलंदाजांनी पहिल्या डावात १७१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावातही अपयशी ठरली आणि यजमान संघ फक्त ११६ धावा करू शकला. यासह भारतासमोर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ८१ धावांचे माफक लक्ष्य ठेवले. भारताने हे लक्ष्य १२.२ षटकांत ३ गडी गमावून सहज पूर्ण केले. अशाप्रकारे, दुसरा कसोटी सामना दोन दिवसांतच संपला. भारताकडून वेदांत त्रिवेदीने नाबाद ३३ धावा केल्या, तर राहुल कुमार १३ धावांवर नाबाद परतला. दुसऱ्या डावात वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विहान मल्होत्राने २१ धावांचे योगदान दिले, तर कर्णधार आयुष म्हात्रेने १३ धावा केल्या.
भारतीय U-19 संघाने वनडे आणि युथ कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं
२ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय सघाने निर्भेळ विजय मिळवण्यापूर्वी, १९ वर्षांखालील संघाने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियावर ३-० ने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या अंडर-१९ संघासमोर ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ दोन्ही मालिकांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्धचा हा सलग पाचवा पराभव होता. यापूर्वी, भारताने ब्रिस्बेनमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना एक डाव आणि ५८ धावांनी जिंकला होता.